Cyber Crime – शेअर बाजारातील गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाकडून उकळलेले २२ कोटी रुपये आरोपींनी सात बँक खात्यातून विविध बँक खात्यात वितरित केले आहेत. या बँक खात्यातून जवळपास ८० हजार बँक व्यवहार झाल्याचे राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवरील तपासात आढळून आले आहे.ही रक्कम राज्यासह परराज्यात आणि परदेशात पाठविण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने तपासाची व्याप्ती वाढली आहे. या प्रकरणात अटक आरोपी मुनिलकुमार सुरेंद्र सिंह (वय ५१, रा. अंबरनाथ, ठाणे), आकाश चंद्रशेखर मराठे (वय २७), लाला केशव उमाप (वय २६) आणि परमेश्वर दिलीप दाभाडे (वय २३, तिघे रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले. त्यांच्यासह एकूण आठ आरोपींविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हडपसरमधील मगरपट्टा येथे राहणाऱ्या ८५ वर्षाच्या ज्येष्ठाने तक्रार दिली आहे. आरोपींपैकी आकाश मराठे, लाला उमाप आणि परमेश्वर दाभाडे यांची बँक खाती पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील एका सेतू केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीयीकृत बँकेत उघडण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित सेतू केंद्र व राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेचा तपास सुरू आहे. उमाप आणि दाभाडे यांचे बँक खाते फसवणुकीची रक्कम फिरविण्यासाठी (म्यूल) वापरले गेले आहेत. मुनिलकुमार सिंह आणि मराठे यांच्या मोबाइलच्या तांत्रिक विश्लेषणातून फसवणुकीची रक्कम हवालामार्फत फिरविली गेल्याचे तपासात निदर्शनास आले आहे. त्यामुळे आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे आणि सरकारी वकील पल्लवी काशीद यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.