IPO Fraud – बँकॉक आणि म्यानमार येथे सायबर फसवणुकीच्या कॉल सेंटर काम केल्यानंतर नवी मुंबई येथे सायबर फसवणुकीचे नवीन कॉल सेंटर सुरु करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली. रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीच्या पुढाकारातून हे कॉल सेंटर सुरु होणार होते. दरम्यान, पोलिसांनी आरोपींचा डाव उधळून लावला. सुशील भगवान जुवाटकर (वय ४२, रा. नवी मुंबई), पंकज राज कपूर (वय ३८, रा. नवी मुंबई. मूळ रा. पंजाब), निश्चल टंकबीर बरेयली (वय २७, रा. नवी मुंबई. मूळ रा. पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात एका कंपनीच्या मालकाला आयपीओ आणि शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल. असे सांगून त्यांच्याकडून दोन कोटी नऊ लाख ३० हजार ५३७ रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना एका बँक खात्यात एक लाख २५ हजार रुपये ट्रान्स्फर झाल्याचे समजले. पोलिसांनी खात्याची माहिती काढून खातेधारक सुशील जुवाटकर याचा शोध घेतला असता तो नवी मुंबई येथे आढळून आला. सायबर फसवणूक (संग्रहित फोटो) त्याचे दोन साथीदार पंकज कपूर आणि निश्चल बरेयली या दोघांना ताब्यात घेतले. पंकज आणि निश्चल हे बँकॉक आणि म्यानमार या देशात जाऊन सायबर फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरमध्ये काम करून आले आहेत. ते सुशील याच्या सांगण्यावरून नवी मुंबई येथे सायबर फसवणुकीचे कॉल सेंटर सुरु करण्याच्या तयारीत होते. आरोपींकडून सहा मोबाइल फोन, तीन पासपोर्ट, तीन पॉस मशीन, दोन लॅपटॉप, दोन हार्डडिस्क, दोन क्यूआर कोड स्कॅनर, १२ शिक्के, वेगवेगळ्या २४ बँकेचे अकाउंट ओपनिंग किट आणि पाच डेबिट कार्ड असा मुद्देमाल आढळून आला. तसेच पिंपरी-चिंचवड येथील व्यावसायिकाची फसवणूक केलेल्या रकमेपैकी ६२ लाख रुपये होल्ड करण्यात आले आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रविकिरण नाळे, पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, वैभव पाटील, सागर पोमण, रोहित डोळस, प्रकाश कातकडे, विद्या पाटील, पोलीस कॉन्स्टेबल दीपक भोसले, विनायक म्हसकर, हेमंत खरात, सुभाष पाटील, अतुल लोखंडे, मुकुंद वारे, किरण देवकर, श्रीकांत कबुले, विशाल निचित, सोपान बोधवड, नितेश बिचेवार, दीपाली चव्हाण, भाविका प्रधान यांच्या पथकाने केली.