Arjun Khotkar : शासकीय विश्रामगृहात सापडलं कोट्यावधीचं घबाड; ‘त्या’ खोलीत दडलंय काय? मंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले…

Dhule Crime News | शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात पाच कोटी रुपये ठेवल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर अनिल गोटे यांनी विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ला बाहेरून कुलूप लावून तेथेच ठाण मांडले होते. याबाबतची चौकशी करण्याच्या मागणीसाठी अनिल गोटे यांनी खोली क्रमांक 102 बाहेर तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले.
त्यानंतर आज सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, ठेकेदारांकडून 15 कोटी रुपये जमा करण्यात येणार होते. पैसे दिले नाही तर त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या सर्व प्रकरणात आता मंत्री अर्जुन खोतकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री अर्जुन खोतकर म्हणाले, सरकार आणि समितीला बदनाम करण्यासाठी हा प्लॅन तर आखला नाही ना, असा सवाल करत आपण हे सर्व आरोप फेटाळत असल्याचे अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे. तर अनिल गोटे यांना असे आरोप करण्याची जुनी सवयच आहे, असंही अर्जुन खोतकरांनी म्हटलं आहे.
दरम्यान, धुळे येथील शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ही अर्जुन खोतकर यांच्या नावावर नोंद असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. तसेच विधीमंडळाच्या अंदाज समितीसाठी ही रक्कम ठेवल्याचा आणि ही रक्कम समितीतील 11 आमदारांना देण्यात येणार असल्याचा आरोप गोटे यांनी केला होता. ही खोली अर्जुन खोतकर यांचे पीए किशोर पाटील यांच्या नावावर नोंद होती.
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्र विधीमंडळ अंदाज समिती तीन दिवसीय दौऱ्यासाठी धुळे जिल्ह्यात दाखल झाली आहे. ही समिती धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामांचा आढावा घेणार आहे. या समितीमध्ये विधिमंडळातील 29 आमदारांचा समावेश असून, आमदार अर्जुन खोतकर हे या समितीचे प्रमुख आहेत. तर त्यापैकी 11 आमदार धुळ्यात दाखल झाले आहेत.
दरम्यान, विधिमंडळातील अंदाज समितीमधील आमदारांना देण्यासाठीच ही रक्कम जमा केल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप आहे. या प्रकरणाबाबत पोलीस प्रशासन काय कारवाई करणार? हे पहावे लागणार आहे. Dhule Crime News |





