Arjun Khotkar : खळबळजनक ! आ. खोतकरांसह मुलाला जीवे मारण्याची धमकी

जालना : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना सोशल मीडिया वरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात अभिमन्यू खोतकर यांनी केलेल्या तक्रारीवरून जालना तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. तसेच अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
अधिक माहितीनुसार वेगवेगळे इन्स्टाग्राम अकाउंट वापरुन आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांच्याविरुद्ध अश्लील शिवीगाळ करत त्यांना गोळ्या घालून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे जालना जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेमध्ये वापरण्यात आलेल्या संबंधित इन्स्टाग्राम अकाउंटची सखोल चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच या अज्ञात व्यक्तीचा शोध देखील पोलिसांच्या वतीने सुरू करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.





