Arjun Khotkar : शिवसेनेच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, पुत्रालाही संपवणार असल्याच्या मेसेजने खळबळ

Arjun Khotkar : शिवसेना शिंदे गटातील जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचा मुलगा अभिमन्यू खोतकर यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी अभिमन्यू खोतकर यांनी जालना तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळ एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वेगवेगळ्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांच्याविरुद्ध अश्लील शिवीगाळ करत, त्यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
अभिमन्यू खोतकर यांनी यासंदर्भात जालना तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा वेगाने तपास करत संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची सखोल चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.
काय म्हणाले अर्जुन खोतकर?
याबाबत बोलताना शिवसेना आमदार अर्जुन खोतकर म्हणाले की, आपण अशा धमक्यांना घाबरत नाही. अलीकडच्या काळात सट्टा, मटका,आयपीएल आणि जमिनी घोटाळे उघड केल्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत असून आम्ही सर्व काही हलक्यात घेत नाही. सर्वांचा बंदोबस्त करू, असा इशाराच अर्जुन खोतकर यांनी दिला.





