Rahul Gandhi “माझ्यावर टीका केल्याने तुमचे गुन्हे लपणार नाहीत..”; राहुल गांधींचा थेट प्रहार !
नीट-सीबीएसई परीक्षांच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

Rahul Gandhi – नीट-सीबीएसई परीक्षांच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. माझ्यावर वैयक्तिक हल्ले केल्याने शिक्षण मंत्र्यांचे गुन्हे लपणार नाहीत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
१८.५ लाख मुलांसाठी उत्तरे मागण्यापासून तुम्ही मला रोखू शकत नाही अशी टिप्पणी राहुल यांनी सोशल मीडियावर केली. पूर्वी ग्लोबारेना हे नाव असलेली आधीच वादात सापडलेल्या कंपनीला सीबीएसईच्या ऑन-स्क्रीन मार्किंगचे कंत्राट का देण्यात आले?
हे कंत्राट कोणाच्या आदेशावरून देण्यात आले? कंपनीची कोणतीही पार्श्वभूमी का तपासली गेली नाही असे सवाल राहुल यांनी विचारले. तुम्ही एकतर कंपनीची पार्श्वभूमी तपासूनही पुढे गेलात, किंवा तुम्ही ती तपासलीच नाही.
दोन्ही परिस्थितीत तुम्ही या घोटाळ्यात तितकेच भागीदार आहात, असा थेट आरोप राहुल यांनी केला. ते पुढे म्हणाले की, जर पंतप्रधानांना खरोखरच विद्यार्थ्यांची काळजी असती, तर लाखो मुलांचे भविष्य धोक्यात आणल्याबद्दल त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांची खूप आधीच हकालपट्टी केली असती.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनीही धर्मेंद्र प्रधान यांच्यावर निशाणा साधला. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात गोंधळ निर्माण करून आणि स्वतःची अकार्यक्षमता सिद्ध केल्यानंतर, मंत्री महोदय केवळ अहंकार आणि राजकीय ड्रामाबाजी करत आहेत.
शिक्षण मंत्रालय हा भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापनाचा अड्डा बनला आहे. २०१४ च्या एनटीए घोटाळ्यानंतरही पंतप्रधान मोदी धर्मेंद्र प्रधान यांचे रक्षण करत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराला जेवढे शिक्षण मंत्री जबाबदार आहेत, तेवढेच पंतप्रधानही जबाबदार आहेत असा आरोप रमेश यांनी केला.
धर्मेंद्र प्रधान यांचे प्रत्युत्तर !
राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, सीबीएसईने भारत सरकारच्या खरेदी धोरणानुसारच सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. तसेच यामध्ये काही अनियमितता आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.
सततच्या निवडणूक पराभवांमुळे राहुल गांधी हताश झाले आहेत आणि त्यांची मानसिक स्थिती वेगळी झाली आहे. त्यांनी यापूर्वी ईव्हीएम आणि डिजिटल इंडियालाही विरोध केला होता. ते भारताच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीच्या पाठीशी उभे राहताना दिसत नाहीत.
धर्मेंद्र प्रधान यांनी सरकारतर्फे विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागितली आणि म्हटले की, विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी जबाबदारी स्वीकारतो. पण ही राजकारण करण्याची वेळ नाही.
सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा मानसिक ताण वाढू न देणे. कोणाच्याही वक्तव्यामुळे विद्यार्थ्यांचा ताण वाढू नये, असे आवाहन मी करतो.






