- स्थायी समितीच्या बैठकीत आयत्यावेळी मान्यता
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर करोना चाचण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या काळात खासगी प्रयोगशाळेमार्फत केलेल्या आरटीपीसीआर चाचण्यांसाठी तीन महिन्यात सुमारे सव्वा कोटी रुपयांचा खर्च महापालिकेने केला आहे. प्रति चाचणी 580 रुपये याप्रमाणे खर्च अदा करण्यात आला असून यासाठी स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे धोरण महापालिकेने राबविले. त्यासाठी महापालिकेच्या आकुर्डी, यमुनानगर, थेरगाव, सांगवी, तालेरा, जिजामाता रुग्णालयात खासगी संस्थेमार्फत आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यासाठी मसर्से. क्रिष्णा डायग्नोस्टिक या खासगी प्रयोगशाळेची नियुक्ती करण्यात आली होती.
या खासगी प्रयगोशाळेने 16 मार्च ते 11 मे 2021 या कालावधीत या विविध चाचणी केंद्रावर मिळून एकूण 20 हजार 769 इतक्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या. त्यासाठी प्रति चाचणी 580 रुपये या प्रमाणे महापालिकेने या खासगी प्रयोगशाळेला एकूण 1 कोटी 20 लाख 46 हजार 20 रुपयांचे बिल दिले आहे. महापालिका आयुक्तांच्या प्रस्तावानुसार स्थायी समितीने आयत्यावेळी हा प्रस्ताव मंजूर केला.