कराेना योद्धा डॉक्टर महिलेची पुण्यात आत्महत्या

- इंजेक्शनचा डोस घेऊन संपवली जीवनयात्रा
पुणे – पतीच्या त्रासाला कंटाळून एका डॉक्टर महिलेने इंजेक्शनचा डोस घेऊन राहत्या घरी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वारजे माळवाडी परिसरात समोर आला आहे. मनीषा रमेश कदम (वय 45, रा. वारजे माळवाडी, मूळ मेढा जि. सातारा) असे महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पतीवर वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रमेश नारायण कदम (रा. वेन्नाचौक, ता. मेढा) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत डॉक्टर महिलेच्या आई मालन अलसे (वय 66) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा या स्त्रीरोग तज्ज्ञ होत्या. तर पती रमेशदेखील डॉक्टर आहे. त्यांचे सातारा जिल्ह्यातील मेढ्यात हॉस्पिटल आहे. 2006 मध्ये त्यांचा विवाह झाला. रमेश नेहमी दारुच्या नशेत तिला मारहाण करत. एवढेच नव्हे, तर चारित्र्याच्या संशयावरुन शिविगाळ करत असे. त्यातूनच अनेकदा उपाशी ठेवले जात होते. त्याने मनीषाला माहेरी सोडल्यावर पुन्हा नांदण्यास नेले नाही. हे वाद सोडवण्यासाठी त्यांच्या सासरच्या मंडळीसोबत बैठकदेखील झाली होती. त्यावेळी पतीने त्यांना सासरी नेण्यास नकार दिला होता.
त्यांची मोठी मुलगी पतीकडे वास्तव्यास होती, तर लहान त्यांच्यासोबत. त्यांना मुलीला भेटता येत नव्हते. त्यामुळे मागील काही दिवसांपासून त्या नैराश्यात होत्या. त्यातून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी इंजेक्शनचा डोस घेत आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस.ए. कथले करत आहेत.
कोविड योद्धा होत्या डॉ. मनीषा
मागील काही महिन्यांपासून डॉ. मनीषा या वारजे येथे माहेरी वास्तव्यास होत्या. सध्या त्या पुणे महापालिकेच्या रुग्णालयात कर्तव्यावर होत्या. कोविड काळातदेखील त्यांनी कर्तव्य निभावले असून, एकाच दिवशी दहा महिलांची प्रसूती यशस्वीपणे करण्याचे कामदेखील त्यांनी केले आहे.
संबंधित दाम्पत्याचे गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरू होते. डॉ. मनीषा यांना सासरी नेण्यास पतीने नकार दिला होता. त्या नैराश्यात होत्या. त्यावर त्यांनी इंजेक्शनचा डोस घेऊन आत्महत्या केली आईने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.
– मच्छिंद्र पंडित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस ठाणे





