नवी दिल्ली – पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर करोनाचा वाढता प्रसार थांबविण्यासाठी कॉंग्रेसने यूपीसह सर्व राज्यातील राजकीय मिरवणुका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
कॉग्रेस पक्षाने निवडणुकीच्या सर्व मोठ्या रॅली रद्द केल्या आहेत. कॉंग्रेस महासचिव आणि यूपीच्या प्रभारी प्रियंका गांधी-वढेरा उत्तरप्रदेशात “लडकी हूं लड सकती ह्ूूं’ या मोहिमे अंतर्गत राज्यभर प्रचार करीत आहेत.
देशभरात करोनाचे रूग्ण वाढत असताना यात आणखी भर पडू नये म्हणून कॉंग्रेसने “लडकी हूं लड सकती हूं’ अंतर्गत होणाऱ्या सर्व मॅराथॉन रद्द केल्या आहेत.
प्रियंका गांधी यांनी ट्वीट करून सांगितले की, त्यांच्या घरातही करोनाचा शिरकाव झाला आहे आणि त्यांनी स्वत:ला आयसोलेटेड करून घेतले आहे. कॉंग्रेसच्या धर्तीवर भाजप सुध्दा राजकीय मिरवणुका रद्द करणार की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील रॅली आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची नोयडातील रॅली रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाल्यामुळे मोदी यांची रॅली रद्द करण्यात आली, हे येथे उल्लेखनीय.
करोनाचे रूग्ण वाढत असल्याने देशभरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु, रात्री संचारबंदी आणिा दिवसा राजकीय पक्षांच्या रॅली असे चित्र आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाने निवडणूक लढू नये का? आणि निवडणुकीत पक्षाचा प्रचार करायला नको का? असा पावित्रा घेतला आहे. कॉंग्रेसप्रमाणे आप सुध्दा रॅली रद्द करणार काय? असा प्रश्न दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी हे उत्तर दिले होते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना करोना झाला आहे. अलिकडेच त्यांनी उत्तराखंडमध्ये रॅली केली होती.