पॅरीस – युरोपात ओमायक्रॉन पुन्हा धुमाकुळ घालू लागला असून तेथे दुसऱ्या लाटे सारखी गंभीर स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मंगळवारी एका दिवसात त्या देशात करोनाच्या 2 लाख 71 हजार 686 केसेस आढळून आल्या आहेत. त्यामुळे रूग्णालय आणि रूग्णालयातील यंत्रणांवर पुन्हा भार येऊ लागला आहे. या साऱ्या धास्तीच्या प्रकारातून फ्रान्समधील सामान्य जनजीवन पुन्हा ठप्प होऊ लागले आहे.
नव्याने करोना बाधित रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण येत्या आठवड्यात दुप्पट झाले आहे. देशातील एकूण आयसीयु बेड्सपैकी 72 टक्के बेडस ओमायक्रॉन बाधित रूग्णांनी भरले आहेत.
त्या देशात करोना लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण 77 टक्के इतके असतानाही फ्रान्समध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉनचा फैलाव झाल्याने चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. फ्रान्समध्ये करोनाने आत्तापर्यंत सुमारे 1 लाख 23 हजार जणांचे बळी घेतले आहेत.
फ्रान्स बरोबरच ब्रिटनमध्येही करोना धुमाकूळ घालू लागला आहे. तेथेही मंगळवारी एका दिवसांत करोनाच्या 2 लाख 18 हजार 274 केसेस आढळून आल्या आहेत.