BMC Election : मुंबईकरांसाठी काँग्रेसचा स्वतंत्र जाहीरनामा; बेस्टसाठी मांडली ठोस योजना

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबईकरांसाठी मोठी राजकीय खेळी करत ‘बेस्ट’साठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मुंबईची दुसरी जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टचा कायापालट करण्यासाठी काँग्रेसने ठोस आणि व्यापक ‘ब्लू प्रिंट’ मांडली आहे.
‘बेस्ट ही नफा कमावणारी संस्था नसून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी असलेली सार्वजनिक सेवा आहे,’ असे ठामपणे सांगत काँग्रेसने बेस्टच्या खासगीकरणाला पूर्णविराम देण्याची घोषणा केली आहे. सध्या सुरू असलेली ‘वेट-लीज’ पद्धत अपारदर्शक असून कामगारांच्या शोषणास कारणीभूत असल्याचा आरोप करत ही पद्धत बंद करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. येत्या तीन वर्षांत बस संचालन, देखभाल आणि कर्मचारी व्यवस्था पूर्णपणे पुन्हा बेस्टकडे देण्यात येणार आहे.
बेस्टवरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षांतील खर्चाचे कॅग-मान्य संस्थेमार्फत लेखापरीक्षण केले जाईल. तसेच बेस्टचा संपूर्ण खर्च थेट मुंबई महापालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पाचा भाग केला जाणार असून, त्यामुळे निधीसाठी वारंवार महापालिकेकडे मागणी करण्याची गरज भासणार नाही.
प्रवाशांवर भाडेवाढीचा भार टाकण्यापूर्वी सार्वजनिक सुनावणी आणि समितीचा अहवाल बंधनकारक करण्याची कायदेशीर हमी काँग्रेसने दिली आहे. ‘फक्त आश्वासने नाही, तर मुंबईच्या ऐतिहासिक बेस्टचा वारसा जपण्यासाठी उत्तरदायी प्रशासन देऊ,’ असा शब्द काँग्रेसने जाहीरनाम्यातून दिला आहे.
काँग्रेसचे बेस्टसाठी ठोस आश्वासन
- २०२८ पर्यंत ३,००० नवीन बस खरेदी करून ताफा ६,०००च्या पुढे नेणार
- मिनी बसऐवजी मोठ्या बसना प्राधान्य
- किमान ४०% बस झोपडपट्टी व औद्योगिक भागांतील प्रवाशांसाठी राखीव
- २०१७ पूर्वीचे कुलाबा–बोरिवलीसारखे लांब पल्ल्याचे मार्ग पुन्हा सुरू
- ‘ड्रायव्हर ओन्ली’ पद्धत बंद करून वाहकांची पुनर्नियुक्ती
- कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान कामासाठी समान वेतन
- ठरावीक कामाचे तास व वैद्यकीय विमा सर्व कर्मचाऱ्यांसाठी
- डेपोच्या जमिनींचे संरक्षण
- प्रवाशांसाठी भारतातील पहिली हक्क व सुरक्षा सनद लागू
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेल्या या जाहीरनाम्यामुळे मुंबईच्या राजकारणात बेस्ट हा मुद्दा केंद्रस्थानी आला असून, काँग्रेसच्या या घोषणांकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.





