Rahul Gandhi : ‘मनरेगा’ मुद्द्यावर काँग्रेसचा देशव्यापी संवाद; राहुल गांधी करणार संबोधित

Rahul Gandhi – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) कमकुवत केली जात असल्याचा आरोप करत काँग्रेसने या मुद्द्यावर देशव्यापी संवाद आयोजित करण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमात देशभरातील मनरेगा कामगार आपल्या-आपल्या कार्यस्थळावरून मुठीभर माती घेऊन सहभागी होणार आहेत, असे काँग्रेसने बुधवारी स्पष्ट केले.
काँग्रेस जयराम रमेश यांनी सांगितले की, मनरेगा बचाओ मोर्चा अंतर्गत राष्ट्रीय परिषदेचे गुरुवारी आयोजन करण्यात आले असून, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी या परिषदेला संबोधित करणार आहेत. परिषदपूर्व तयारीचा भाग म्हणून देशभरातील कामगार त्यांच्या कामाच्या ठिकाणाहून माती घेऊन दिल्लीत येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी बोलताना काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनी आरोप केला की, भाजप सरकार मनरेगाऐवजी लोकांचे हक्क हिरावून घेणारे नवीन कायदे आणत आहे आणि त्यामुळे या योजनेचा मूळ उद्देशच धोक्यात आला आहे. कोविड काळात मनरेगा कोट्यवधी लोकांसाठी जीवनरेखा ठरली होती आणि या योजनेतून ग्रामीण भागात रस्ते, शाळा, पंचायत इमारती, तलाव आणि पाणी साठवण प्रकल्प उभारले गेले, असे त्यांनी नमूद केले.
दीक्षित यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी दिल्लीतील जवाहर भवन येथे होणाऱ्या कार्यक्रमात देशाच्या विविध भागांतील कामगार सहभागी होतील. ते आपल्या संघर्षाच्या कथा मांडतील आणि भविष्यातील रणनीतीवर चर्चा करतील. कामगारांकडून आणलेली माती एकत्र करून मनरेगाच्या रक्षणासाठी सामूहिक संघर्षाचा प्रतीकात्मक संदेश दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.





