Mallikarjun Kharge : युपीतील भाजप सरकार दलित विरोधी; मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका
उत्तर प्रदेशातील मेरठ येथे झालेल्या एका दलित महिलेच्या क्रूर हत्येवरून काँग्रेसने भाजप सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला.

Mallikarjun Kharge : उत्तर प्रदेशातील मेरठ येथे झालेल्या एका दलित महिलेच्या क्रूर हत्येवरून काँग्रेसने भाजप सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत, यामुळे भाजपच्या ‘डबल-इंजिन’ सरकारचा महिला आणि दलित-विरोधी चेहरा पुन्हा एकदा उघड झाला असल्याची टीका केली आहे.
ललिता गौतम ही महिला १५ मे रोजी मेरठमधून बेपत्ता झाली होती आणि १७ मे रोजी तिचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी मुख्य आरोपीसह इतरांना अटक करण्यात आली आहे.
मात्र, बुधवारी पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवणे आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप करत ७ जणांना अटक केली असून ३० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या चकमकीत ११ पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत योगी सरकारवर दडपशाहीचा आरोप केला. पीडितेचे कुटुंब न्यायासाठी आर्त हाक घालत आहे, परंतु त्यांचे म्हणणे ऐकण्याऐवजी सरकार विरोधकांना नजरकैदेत ठेवून आणि लाठीमार करून सत्य लपवत आहे. हातरस आणि उन्नावप्रमाणेच मेरठमध्येही पीडितांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे खर्गे म्हणाले.
सत्तेची खुर्ची उखडून टाकेल…
एनसीआरबीच्या आकडेवारीचा संदर्भ देत त्यांनी दावा केला की, २०१३ ते २०२४ या काळात देशात अनुसूचित जातींवरील गुन्ह्यांमध्ये ४१ टक्क्यांनी वाढ झाली असून दररोज सरासरी १२ दलित महिलांवर अत्याचार होत आहेत. पीडितेच्या कुटुंबाला लाठ्यांची नाही तर न्यायाची गरज आहे. दलित, वंचित आणि शोषितांच्या आवाजाचा हा वाढता लोंढा लवकरच भाजपची सत्तेची खुर्ची उखडून टाकेल, असा इशारा खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी दिला.






