Collector Jitendra Dudi: शिवरस्ते व पाणंद रस्त्यांसाठी भरीव निधी देणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची ग्वाही
Collector Jitendra Dudi: थेऊर येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत' शिबिर संपन्न; जितेंद्र डुडी यांनी दिले शिवरस्ते अन् पाणंद रस्त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश.

Collector Jitendra Dudi – भटके-विमुक्त आणि आदिवासी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले, विविध शासकीय प्रमाणपत्रे, निवारा तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महसूल विभाग सातत्याने कार्यरत आहे. आतापर्यंत सुमारे 1 हजार 800 कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्यात आली असून,
जमीन व घर नसलेल्या कुटुंबांपर्यंतही योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. तसेच हवेली तालुक्यातील शिवरस्ते आणि पाणंद रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती हवेली आणि अप्पर तहसील कार्यालय हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने ’छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत थेऊर येथे आयोजित विशेष ‘समाधान शिबिरात’ ते बोलत होते.

थेऊर : येथे आयोजित विशेष ‘समाधान शिबिरा’त मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व उपस्थित मान्यवर.
जिल्हाधिकारी डुडी यांनी महसूल दिन प्रथमच ग्रामीण भागात अभियानाच्या स्वरूपात साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना, पुरंदर विमानतळासाठी जमीन हस्तांतरण प्रक्रियेत महसूल अधिकार्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी हवेली तालुक्यात काही विकासकांनी विनापरवानगी नैसर्गिक ओढे-नाले बुजवल्यामुळे पावसाचे पाणी वस्तीमध्ये शिरत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच नदी प्रदूषणामुळे वाढलेल्या डासांच्या प्रादुर्भावावर उपाययोजना करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, प्रांताधिकारी यशवंत माने, तहसीलदार तृप्ती कोलते, पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, उपसभापती विद्या गायकवाड,
जिल्हा परिषद सदस्या सुरेखा हरगुडे, संदेश आव्हाळे, रमेश हरगुडे, पंचायत समिती सदस्य अमोल टेकाळे, सुदर्शन चौधरी, कृषिराज चौधरी, राणी वाळके, सुषमा मुरकुटे, संतोष मुरकुटे, महावितरणचे देविदास बैकर, उपअभियंता महादेव धाडवे, तसेच महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





