Electricity Wire Theft: महावितरणचे ‘विद्युततारा’ चोरणारी टोळी गजाआड; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
Electricity Wire Theft: पोलिसांची मोठी कामगिरी: विद्युत तारा चोरीचे ५ गुन्हे उघड, पिकअप गाडीसह १ हजार किलोहून अधिक अॅल्युमिनियम जप्त!

Electricity Wire Theft – पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या महावितरणच्या विद्युत खांबांवरील अॅल्युमिनियम तारा चोरीच्या मालिकेचा अखेर पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिसांना यश आले आहे. संयुक्त कारवाईत चार जणांच्या टोळीला अटक करण्यात आली असून पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून एकूण 11 लाख 43 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सुरेश बबन जाधव (वय 23), दत्तात्रय ऊर्फ राघू किरण मदने (वय 26), आनंदराव ऊर्फ संजय उमाजी मदने, आणि बापूराव ऊर्फ बापू धोंडीराम मदने (वय 33), सर्व रा. ता. खटाव, जि. सातारा, यांना अटक केली आहे. पुसेगाव परिसरात महावितरणच्या विद्युत खांबांवरील अॅल्युमिनियम तारा वारंवार चोरीला जात असल्याने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी या गुन्ह्यांचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके आणि पुसेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने घटनास्थळांची पाहणी, गोपनीय माहिती संकलन आणि सायबर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढला. पोलीस पथकाने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. यावेळी केलेल्या चौकशीत त्यांनी संगनमताने पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच ठिकाणी विद्युत तारा चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपींकडून चोरीस गेलेल्या 1208 किलो वजनाच्या अॅल्युमिनियम तारा (किंमत 5 लाख 43 हजार 600 रुपये) चोरीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा मॅक्स पिकअप (एमएच-16-एवाय-9665) किंमत 6 लाख रुपये असा एकूण 11 लाख 43 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पुसेगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली.





