Khandala Land Scam: महसूल विभागात मोठा ‘झोल’! ३२ गुंठे जमीन दुसऱ्याच्या नावावर केली; तलाठ्यासह तिघांवर गुन्हा
Khandala Land Scam: न्यायालयाच्या कलम १५६(३) अन्वये दिलेल्या स्पष्ट आदेशानंतर लोणंद पोलिसांत तत्कालीन तलाठी, सर्कल अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल.

Khandala Land Scam – तब्बल दोन दशकांहून अधिक काळ महसूल अभिलेखांमध्ये कथित फेरफार करून 32 गुंठे जमीन दुसर्याच्या नावावर चढविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका खासगी व्यक्तीसह तत्कालीन तलाठी आणि सर्कल अधिकार्यांवरच संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडप केेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतर अखेर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी रशिदाखातून सलीम शेख, (वय 51, रा. नाळेमळा-जाधववाडी, ता. फलटण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पिंपरे बुद्रुक,
(ता. खंडाळा) येथील गट क्रमांक 65 मधील त्यांच्या मालकीच्या 32 गुंठे जमिनीच्या नोंदीमध्ये 2002 पासून डिसेंबर 2023 या कालावधीत कथितरित्या फेरफार करण्यात आला. बनावट कागदपत्रांच्या आधारे संबंधित जमीन मयत रहिमतबी इनामदार (मुलाणी) यांच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी चाँद महंमद इनामदार, रा. निरा, ता. पुरंदर, तत्कालीन तलाठी आरती महादेव दळवी आणि तत्कालीन सर्कल अधिकारी रुपाली यादव यांच्याविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, विश्वासघात, सरकारी अधिकाराचा गैरवापर आणि संगनमत अशा गंभीर स्वरूपाच्या भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी फिर्यादीला थेट पोलिसांकडे न्याय मिळाला नाही. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, खंडाळा यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 156(3) अन्वये आदेश दिल्यानंतरच पोलिसांना गुन्हा नोंदवावा लागला. त्यामुळे एवढ्या गंभीर आरोपांनंतरही कारवाईस विलंब का झाला, याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करीत असून आरोपींना अटक करण्यासाठी पथके कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.





