पुणे – शहरासह जिल्ह्यातला तापमानाचा पारा सातत्याने खाली येत असून, शनिवारी एनडीए परिसरात ८.२ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविले गेले. हवेली, माळीण, शिवाजीनगर आणि पाषाण परिसरातील थंडीचा पारा दहा अंशांखालीच असल्याने हुडहुडी भरणाऱ्या थंडीने पुणेकर गारठले. दहा दिवसांपूर्वी शहरातील कमाल तापमान ३० अंशांपुढे, तर किमान तापमान १७ अंशांवर होते. मात्र, हवामानातील बदलामुळे मागील चार दिवसांपासून किमान तापमानात झपाट्याने घट झाली आणि थंडीचा पारा ८ अंशांवर आला. कमाल तापमानही २५ ते २६ अंशावर आले. सलग चौथ्या दिवशी शहराच्या काही भागात थंडीची लाट असून, जिल्ह्यातही थंडी आणि धुक्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दिवसभर गारवा जाणवत असून, आज सकाळपासून ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे गारवा अधिक जाणवत आहे. शहरासह जिल्ह्यात पुढील दोन दिवस हवामान कोरडे राहील. काही भागात किमान तापमानात किंचीत वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. शहर-जिल्ह्यातील किमान तापमान (अंश से.) एनडीए – ८.२, हवेली – ९.१, माळीण – ९.६, शिवाजीनगर – ९.७, पाषाण – ९.९, तळेगाव आणि शिरूर – १०.७, दौंड – १०.८, राजगुरूनगर – ११, नारायणगाव – ११.७, पुरंदर – १२.२, बारामती आणि हडपसर – १२.३, इंदापूर आणि लवासा – १२.४,