बीजिंग – चीनच्या प्रमुख सरकारी मोबाइल कंपनीला अमेरिकेच्या बाजारातून हटवण्यात आले आहे. या कंपनीच्या हकालपट्टीची प्रक्रिया सुरू असल्याचे “फेडरल कम्युनिकेशन कमिशन’ने म्हटले आहे. या कंपनीला अमेरिकेतील व्याप गुंडाळण्यास 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि चीनबरोबरचे संबंध ताणले जात असल्याच्या कारणाने या चीनी कंपनीला अमेरिकेच्या बाजारातून हटवण्यात येत आहे. फेडरल कम्युनिकेशन कमिशनच्या या निर्णयानुसार चीनच्या प्रमुख 3 सरकारी कंपन्यांपैकी एक असलेल्या चायना टेलिकॉम लिमिटेडची अमेरिकेतील कंपनी असलेल्या चायना टेलिकॉम (अमेरिका) कॉर्पोरेशनला अमेरिकेत आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय सेवा थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या मोबाइल कंपनीच्या माध्यमातून अमेरिकेतील अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण केला जाऊ शकतो. तसेच अमेरिकेतील दूरसंचार प्रणालीमध्ये अडथळे आणले जाऊ शकतात, असा धोका व्यक्त केला गेला आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकालात चिनी कंपन्यांच्या हकालपट्टीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया बायडेन यांच्या प्रशासनानेही सुरू ठेवली आहे.