गांधीनगर – दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी करण्यास केंद्राकडून मदत हवी. त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
अहमदाबाद येथील गांधीनगर येथे पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या 26व्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा होते. तिलारी सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गोवा राज्यासोबत समन्वयाने काम करीत असून, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठकही झाल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले, नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच राज्यातील ही खरेदी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी, अशी विनंतीही त्यांनी केली. तसेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे. हा मराठी अस्मितेचा प्रश्न असून, याबाबतीत केंद्राने लवकरात लवकर निर्णय घ्यावा.
राज्य शासन डहाणू ते सिंधुदुर्ग पर्यंत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोस्टल रोड(किनारी मार्ग) तयार करीत आहे. गोवा आणि गुजरात या राज्यांशी जर हा मार्ग जोडला गेला तर निश्चितच या राज्यात पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढेल त्याचप्रमाणे सागरी किनारा सुरक्षेच्या दृष्टीनेही फायदा होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
आणखी 34 योजना डीबीटीमध्ये जोडणार
महाराष्ट्रातील 2 हजार 444 ग्रामपंचायती भारतनेटद्वारे जोडल्या जातील. तसेच 12 हजार 513 ग्रामपंचायतींनी “फायबर टू द होम कनेक्शन’साठी बीएसएनएल सोबत सामंजस्य करार केला आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक खरेदीमध्ये “मेक इन इंडिया’ला प्राधान्य देत राज्य खरेदी धोरणात सुधारणा केली आहे. याशिवाय शासकीय योजनांचा लाभ योग्य लाभार्थीपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यात महाडीबीटी योजना सुरू करण्यात आली आहे. त्यात आणखी 34 योजना जोडण्याचे काम सुरु आहे.
महाराष्ट्रातील 1 लाख 80 हजार मच्छिमारांना बायोमेट्रिक कार्ड देण्यात आले आहेत तसेच राज्यात बॅंकिंग नेटवर्कचे जवळपास 100 टक्के कव्हरेज उपलब्ध असून जी गावे उरली आहेत तेथे राज्य बॅंकर्स समितीला ही सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.