श्रीरामांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

हडपसर : “हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीचे पाहिलेले स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरमधील कलम ३७० ही हटवले. आता लाडक्या बहिणींकडून योजनेचे जोरदार स्वागत होत आहे. लाडका भाऊ, ज्येष्ठ नागरिकांसह अनेक योजना कार्यरत होत आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांना काहीही काम राहणार नाही. मात्र, सर्व श्रीरामभक्तांनी आगामी विधानसभेत लोकसभेसारखे गाफील राहू नका,’ असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. हांडेवाडी रस्त्यावरील श्रीराम चौकात शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी स्वखर्चातून उभारलेल्या देशातील सार्वजनिक ठिकाणी पहिल्या पूर्णाकृती श्रीराम शिल्पाचे उद्घाटन व लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी विधान परीषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार चेतन तुपे पाटील, विधान परिषद सदस्य आमदार योगेश टिळेकर, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे ,म्हाडाचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,शहर प्रमुख नाना भानगिरे, मंगेश चिवटे, आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील श्रीरामभक्त मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “प्रभू श्रीरामाच्या हातात धनुष्यबाण आहे आणि तो शिवसेनेकडे आहे. प्रभू रामचंद्र आमच्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. विरोधकांनी त्याचे राजकारण केले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना धडा शिकवायचा आहे.
आज श्रीराम भक्तांच्या मनात असलेले श्रीराम या शिल्पाच्या रूपातून ऊर्जास्त्रोत देत राहतील. मुख्यमंत्री यांच्या हस्ते या शिल्पाचे लोकार्पण होत आहे. भर पावसातही रामभक्त व नागरिकांनी या सोहळ्यात सहभाग नोंदवला हे माझे मोठे भाग्य आहे .मिळणारे समाधान मोठे आहे.
प्रमोद नाना भानगिरे (शहर प्रमुख ,शिवसेना)
…….,पण नाना कामे मोठी करतो
आज एवढ्या भर पावसात प्रभू श्रीरामाचे लोकार्पण झाले आहे. प्रमोद नाना दिसतो छोटा पण कामे मोठे करतो. तो पक्का राम भक्त व छत्रपतींचा मावळा आहे. पुण्यातील पूरस्थितीत त्याने स्वतः स्वयंसेवकांना घेऊन लोकांना मदत केली. श्रीराम शिल्पाच्या उभारणीने त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.’नानाला सांगितलेले काम कधीही तो अर्धवट सोडून देत नाही. तो ते जिद्दीने पूर्ण करतो,हे या श्रीरामाच्या शिल्प उभारणीतून दिसून येते. नानाच्या या कामाबद्दल त्याला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत ,असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.





