मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. अमरावती, पुण्यासह आता मुंबईतही या मतदान प्रक्रियेला गालबोट लागले आहे. राजकीय द्वेषातून तुर्भे स्टोअर येथील शिवसेनेच्या शाखेची तोडफोड करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. आज पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज सकाळी शिवसैनिक शाखेच्या ठिकाणी गेले असता ही बाब निदर्शनास आली आहे. या प्रकारासंदर्भात अद्याप कुणीही गुन्हा दाखल केलेला नाही. परंतु लवकरच शिवसैनिक या संदर्भात गुन्हा दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी या विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला आणि गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी साडेपाच वाजता भुयार यांच्यावर हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी त्यांची गाडीही पेटवली.
तर पिंपरी चिंचवडचे स्थायी समितीचे माजी सभापती आणि माजीउपमहापौर डब्बू आसवानी यांना मारहाण करण्यात आली आहे. आपल्या कार्यालयाबाहेर थांबलेल्या माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांच्यावर हल्ला झाला.
पिंपरी कॅम्पमध्ये सुरू असणाऱ्या मतदान केंद्राजवळ राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात हाणामारी झाली. या कार्यकर्त्यांच्या हाणामारीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
हे पण वाचा
पिंपरी कॅम्पमध्ये राष्ट्रवादी-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
अमरावतीमध्ये स्वाभिमानीच्या उमेदवारावर गोळीबार
पिंपरीत माजी उपमहापौरांवर हल्ला