पेट्रोल ओतून गाडीही पेटवली
अमरावती – जिल्ह्यातल्या मोर्शी या विधानसभा मतदारसंघात एक धक्कादायक घटना घडली आहे. मोर्शी विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला आणि गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी साडेपाच वाजता भुयार यांच्यावर हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी त्यांची गाडीही पेटवली.
दरम्यान, स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘देवेंद्र भुयार यांना सकाळी साडेपाच वाजता गाडीतून खेचून मारहाण करण्यात आली. यावेळी शहरातील काही लोक मॉर्निंग वॉकला आले होते, या लोकांनी गोळीबाराचा आवाज आल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यानंतर हल्लेखोरांनी पेट्रोल ओतून गाडी पेटवली. संवेदनशील मतदारसंघ असताना पोलीस इतके बेफीकीर का राहिले? महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे का? असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
मोर्शीतून कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे आणि स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भुयार यांच्यात थेट लढत आहे. भुयार हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार असले, तरी त्यांना उभय पक्षांकडून किती मदत मिळते, यावर त्यांचे भवितव्य ठरणार आहे.