Market Yard : मार्केट यार्डत ५० किलोपेक्षा जास्त वजनाचा प्रश्न पुन्हा पेटला!
Market Yard :

कामगार आक्रमक; आडत्यांसोबतच्या बैठकीत तात्पुरता तोडगा
१ डिसेंबरपासून अधिक वजनाच्या गोण्या आल्यास न उतरविण्याचा कामगारांचा निर्धार
Market Yard : मार्केट यार्डात ५० किलोपेक्षा जास्त वजनांच्या गोणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तरकारी विभागात वाटाणा आणि गाजराच्या ६० ते ७० किलो वजनाच्या गोण्या आल्याने कामगारांनी संबंधित गाड्या खाली न करण्याचा पवित्रा घेत काम थांबवले. त्यानंतर आडते, व्यापारी आणि कामगार यांच्यात चर्चा झाली. या चर्चेमध्ये १ डिसेंबरपर्यंत गोण्यांच्या वजनात बदल करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
कामगारांच्या आरोग्याचा विचार करून ५० किलोपेक्षा कमी वजनाच्या गोण्यांमध्येच शेतमाल पाठवावा, यासाठी कामगार युनियनच्या वतीने या पूर्वीही शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती केली आहे.
महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीनेदेखील राज्य पातळीवर सर्व बाजार समित्यामध्ये आंदोलने करण्यात आली. त्याला व्यापारी व शेतकरी बांधवांनी सकारात्मक प्रतिसादही दिला होता. राज्य सरकारनेही याबाबत अध्यादेश काढला आहे. त्यानंतर पुन्हा ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्या येत असल्याने कामगार आक्रमक झाले आहेत.
रविवारी (दि. २२) यासंदर्भात कामगार युनियनच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत हमाल, तोलणार, वारणार, लावणार व गाळा कामगारांनी ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्या खाली न करण्याचा निर्धार व्यक्त केला.
त्यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक संतोष नांगरे यांच्यासह कामगार युनियनचे सचिव विशाल केकाणे, संजय साष्टे, राहुल जेधे, बाबू केकाण, सचिन कांदे, संदीप लिमण, योगेश चोरघे, संतोष चोरघे, शंकर कसबे, बाळासाहेब जाधव, गणेश हरपुडे तसेच आडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष व बाजार समितीचे संचालक बापू भोसले, सतीश चव्हाण, बापू वाडकर यांच्यासह आडते व कामगार उपस्थित होते.
१ डिसेंबरनंतरही ५० किलोपेक्षा अधिक वजनाचा कोणताही शेतीमालाच्या गोण्या बाजारात आल्यास गाडी खाली केली जाणार नाही. तसेच, ५ डिसेंबरपासून संपूर्ण मार्केट यार्ड बेमुदत बंद ठेवण्यात येईल.
– संतोष नांगरे, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड कामगार युनियन





