Mohammadwadi: महंमदवाडीतही जलवाहिनी फुटली; शिवसेनेचे महापालिका प्रशासनावर टीकास्त्र
Mohammadwadi:

Mohammadwadi: पुणे शहरात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवून नागरिकांवर पाणी कपातीचा भार टाकला जात असताना, दुसरीकडे महापालिकेच्या फुटलेल्या जलवाहिन्यांमधून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे.
प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असून, पुणेकरांच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत महापालिका प्रशासन किती गंभीर आहे, असा संतप्त सवाल शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी उपस्थित केला आहे.
महंमदवाडी येथील शालिमार चौकात जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर वाहून गेले. एकीकडे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जाते, तर दुसरीकडे महापालिकेच्या यंत्रणेकडून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. हा प्रकार म्हणजे पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणाचा स्पष्ट नमुना असल्याची टीका भानगिरे यांनी केली.
महापालिका आयुक्तांनी पुणे शहरातील सर्व जीर्ण आणि वारंवार फुटणाऱ्या जलवाहिन्यांचे तातडीने तांत्रिक सर्वेक्षण करावे. जलवाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सक्षम मॉनिटरिंग यंत्रणा उभारावी तसेच पाणीगळतीच्या घटनांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी भानगिरे यांनी केली आहे. दरम्यान, तक्रारीनंतर ही फुटलेली जलवाहिनी नंतर दुरुस्त करण्यात आली.





