Chakan Road Accident : चाकण-शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Chakan Road Accident : चाकण-शिक्रापूर रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरूच; वाढती वाहतूक आणि वेगाच्या मर्यादेअभावी आणखी एका निष्पाप तरुणाचा बळी.

Chakan Road Accident : भरधाव वेगाने येणाऱ्या एका टेम्पोने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि. २५) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास चाकण-शिक्रापूर रोडवरील रासे गावच्या हद्दीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण हेमराज दोडके असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
प्रवीण हा शनिवारी रात्री उशिरा आपल्या दुचाकीवरून (क्रमांक: MH 14 MK 9837) चाकण-शिक्रापूर रस्त्यावरून प्रवास करत होता. रासे गावच्या हद्दीत आले असता, समोरून येणाऱ्या एका भरधाव टेम्पोने (क्रमांक: MH 14 KQ 0241) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.हा अपघात इतका भीषण होता की, प्रवीणच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
टेम्पो चालकावर गुन्हा दाखल
याप्रकरणी मृत तरुणाचे वडील हेमराज सोमा दोडके (वय ४५, रा. भोसरी, पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी टेम्पो चालक प्रवीण गंभीरे (वय २८, रा. चाकण, पुणे) याच्या विरोधात निष्काळजीपणाने गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकारणी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी टेम्पो चालक प्रवीण गंभीरे हा आपला टेम्पो अत्यंत वेगाने आणि हयगयीने चालवत होता. त्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. या प्रकरणी चाकण पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे. चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील वाढती वाहतूक आणि वाहनांचा वेग यामुळे अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.





