Bhugaon Traffic – वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पीएमआरडीए ने कंबर कसली असून, महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आता ॲक्शन मोड मध्ये आले आहेत. पुणे-कोलाड महामार्गावरील कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या भूगाव बायपास च्या कामातील तांत्रिक अडथळे दूर करण्यास प्राधान्य देण्यात येत असून, लवकरच या प्रकल्पाचे काम गतीने सुरु होणार आहे. हा बायपास मार्ग मार्गी लागण्यास भूगाव येथील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी नुकतीच भूगाव बायपासच्या नियोजित मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी त्यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आणि प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. हा रस्ता पीएमआरडीए आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित केला जाणार आहे. पाहणी दौऱ्यादरम्यान डॉ. चौधरी यांनी स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला. त्यांच्या जमिनींच्या संपादनाबाबत असलेल्या शंकांचे निरसन करत त्यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेतले. भूसंपादनातील प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून, लवकरच कामाचे आदेश दिले जातील, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. केवळ भूगावच नव्हे, तर वाघोली, शिक्रापूर, चाकण आणि लोहगाव या भागांतील रखडलेले पायाभूत प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पीएमआरडीए ने विशेष मोहीम हाती घेतली आहे. वाढते शहरीकरण आणि वाहनांची संख्या लक्षात घेता, या उपनगरांना जोडणारे पर्यायी रस्ते वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे. “पुणे महानगर क्षेत्रातील वाढती गर्दी आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता भूगाव बायपाससारखे प्रकल्प वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवून आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन हे काम वेगाने पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्हीची बचत होईल.” – डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त प्राधिकरण