Pune Accident : काळ बनून आला पाण्याचा टँकर; बिबवेवाडीतील भीषण अपघातात व्यावसायिकाचा दुर्दैवी अंत
Pune Accident : भरधाव टँकरच्या धडकेत व्यावसायिकाने गमावला जीव; परिसरातील वाहतूक सुरक्षा आणि बेदरकार चालकांवर कडक कारवाईची मागणी.

Pune Accident – बिबवेवाडी-कोंढवा रोडवर शनिवारी सकाळी भरधाव पाण्याच्या टँकरने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघातात एका व्यावसायिकाचा मृत्यू झाला. मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अनिल सिताराम आल्हाट ( ४७, रा. मार्केटयार्ड, पुणे) यांचा अपघातात मृत्यू झाला.
आल्हाट सकाळी १०:३० वाजता होंडा शाईन दुचाकीवरून कोंढवा-बिबवेवाडी रोडने चंद्रलोक चौकाकडे जात होते. त्यावेळी कल्याण भेळ दुकानासमोरील रस्त्यावर दुभाजकाजवळून जाताना मागून येणाऱ्या सहा चाकी पाण्याच्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. हा टँकर निलेश लक्ष्मण पोटे ( ३६, रा. बिबवेवाडी, पुणे) चालवत होता.
त्याने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून दुचाकीला डाव्या बाजूने धडक दिल्याने आल्हाट गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादी महादेव गोरख कांबळे ( ३७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चालक निलेश पोटे व टँकर मालक बगतावरमल राठी ( ५७, रा. सुखसागर नगर, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
तपासात असेही समोर आले आहे की, संबंधित टँकरचे फिटनेस प्रमाणपत्र मुदत संपलेले असतानाही ते रस्त्यावर चालविण्यात येत होते. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी तसेच मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले होते.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पाटील करीत आहेत. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, बेदरकार वाहनचालकांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.





