Chakan Potholes Issue: जिल्हाधिकाऱ्यांचा अल्टिमेटम संपला; चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था कायम
Chakan Potholes Issue: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेली ३१ ऑगस्टची मुदत संपून सात दिवस झाले तरी चाकण परिसरातील खड्डे व साईडपट्ट्यांची दुरुस्ती रखडलेलीच.

Chakan Potholes Issue – चाकण औद्योगिक वसाहतीतील समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याचे शासन आणि प्रशासनाकडून दिलेले आश्वासन हवेतच विरल्याचे चित्र आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 31 ऑगस्टपर्यंत चाकण औद्योगिक वसाहतीतील खड्डे बुजविणे आणि साइडपट्ट्या दुरुस्त करण्याचे दिलेले आश्वासन मुदत उलटून सात दिवस झाले तरी बहुतांश ठिकाणी अपूर्णच आहे.
त्यामुळे मंत्र्यांसमोर अधिकार्यांनी केलेली आश्वासने ही केवळ ‘स्टंटबाजी’ होती का, असा सवाल आता नागरिक आणि उद्योजकांकडून उपस्थित केला जात आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतील वाढत्या असुविधांमुळे काही कंपन्यांनी वसाहत सोडण्याचा इशारा दिल्यानंतर शासन आणि प्रशासन खडबडून जागे झाले होते.
महाळुंगे येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या उद्योगविषयक बैठकीत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रशासनाला विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. स्थानिक नागरिक, कामगार आणि उद्योजकांची वाहतूककोंडीसह अन्य समस्यांतून सुटका करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र, बैठक होऊन काही दिवस उलटताच या आश्वासनांची धार बोथट झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्हाधिकार्यांसह संबंधित अधिकार्यांनी ठरावीक मुदतीत कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असतानाही प्रत्यक्ष परिस्थितीत फारसा बदल झालेला नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 31 ऑगस्टपर्यंत चाकण औद्योगिक वसाहतीतील खड्डे बुजविण्याचे, तसेच पुढील दहा महिन्यांत नागरिकांना प्रशस्त आणि पक्के रस्ते उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, मुदत संपूनही अनेक ठिकाणी खड्डे कायम आहेत. काही ठिकाणी खड्डे भरण्यासाठी मुरूमाचे ढीग टाकण्यात आले आहेत; परंतु ते अद्याप तसेच पडून आहेत. काही ठिकाणी मातीमिश्रित मुरूम टाकण्यात आल्याने पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही भागांत मोठमोठे दगड असलेला मुरूम टाकण्यात आला असून त्याचे योग्य पद्धतीने सपाटीकरण किंवा दबाई करण्यात आलेली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
त्यामुळे केवळ ‘काम पूर्ण केल्याचे दाखविण्यासाठी’ घाईघाईने कामे करण्यात आली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतील समस्यांचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून तळेगाव चौकातील सांडपाण्याच्या प्रश्नाकडे पाहिले जात आहे. अनेक दिवसांपासून या भागातील सांडपाण्याचा प्रश्न कायम असून त्यावर ठोस उपाययोजना झालेली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. जिल्हाधिकार्यांनी समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्यानंतरही प्रश्न कायम असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.






