Shivneri Fort: शिवनेरी गडाच्या परिसरात अतिक्रमण? किरीट सोमय्यांचा प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टीमेटम
Shivneri Fort: शासकीय विश्रामगृहात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून किरीट सोमय्यांनी केली शिवनेरी परिसराची प्रत्यक्ष पाहणी.

Shivneri Fort – छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी शिवनेरी गडाच्या पायथ्याशी होत असल्याचा दावा करण्यात आलेल्या कथित अतिक्रमणांप्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रशासनाला सात दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत ठोस कारवाई न झाल्यास हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने गडाच्या पायथ्याशी ठिय्या आंदोलन करण्यात येईल आणि त्यात आपण स्वतः सहभागी होणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
शिवनेरी गड परिसरातील कथित अतिक्रमणांची पाहणी करण्यासाठी सोमय्या सोमवारी (दि. 7) जुन्नर येथे आले होते. त्यांनी प्रथम शासकीय विश्रामगृहात विविध विभागांच्या अधिकार्यांची बैठक घेऊन या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर शिवनेरी गडाच्या पायथ्याशी जाऊन कथित अतिक्रमणांची प्रत्यक्ष पाहणी केली. शिवनेरी गडाच्या परिसरात ‘लँड जिहाद’ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
गडाच्या 100 मीटर परिसरात कथित अतिक्रमण झाल्याचे सांगत, याबाबत सात तक्रारी पोलीस प्रशासनाकडे दाखल झाल्याचा दावा त्यांनी केला. जागा बळकावण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप करीत या प्रकाराची तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. कथित अतिक्रमणांबाबत स्थानिक प्रशासनाने सात दिवसांत ठोस कारवाई न केल्यास हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मोठ्या प्रमाणात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सोमय्या यांनी दिला.
शिवनेरीच्या पावित्र्याशी संबंधित हा विषय असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मंत्रालयात शिवनेरी गड परिसरातील कथित अतिक्रमणांबाबत विशेष बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष संतोष नाना खैरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष गणेश कवडे, नंदकुमार तांबोळी, वैभव परदेशी, सुनील काळे, संजय वर्हाडी, सागर कुर्हे, सचिन खत्री यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कुसूर ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी
यावेळी सोमय्या यांनी महसूल, वन, पुरातत्त्व आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. शिवनेरी गड राष्ट्रीय संरक्षित स्मारक असल्याने परिसरातील बांधकामांबाबत नियम आहेत. मात्र, संबंधित विभागांकडून पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने अतिक्रमण वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला.






