Bhimashankar: ‘हर हर महादेव’च्या जयघोषात भीमाशंकर दुमदुमले! शेवटच्या श्रावणी सोमवारी भाविकांची मांदियाळी
Bhimashankar: श्रावणातील चौथ्या सोमवारी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाराष्ट्रासह परराज्यातून लाखो भाविक दाखल; पहाटेपासूनच दर्शनासाठी भव्य रांगा.

Bhimashankar – श्रावणातील चौथ्या आणि शेवटच्या सोमवारी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भक्तीचा महासागर लोटला. अधूनमधून बरसणार्या श्रावणसरी, दाट धुके, गार वार्याच्या झुळका आणि प्रसन्न निसर्गरम्य वातावरणात लाखो भाविकांनी ‘जंगलवस्ती भीमाशंकर की जय’, ‘हर हर महादेव’च्या जयघोषात भगवान शिवाच्या पवित्र ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. भाविकांच्या गर्दीने संपूर्ण भीमाशंकर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने महाराष्ट्रासह परराज्यांतून मोठ्या संख्येने भाविक भीमाशंकरमध्ये दाखल झाले होते. मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने भाविकांचा ओघ वाढला. पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाविकांच्या ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने सह्याद्रीच्या दर्याखोर्याही दुमदुमून गेल्या.
माजी परिवहनमंत्री अनिल परब यांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन पवित्र शिवलिंगावर जलाभिषेक केला. भाविकांनीही मनोभावे पूजा-अर्चा करून सुख, समृद्धी व आरोग्यासाठी महादेवाला साकडे घातले. भीमाशंकर परिसरात अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या. दाट धुक्याने मंदिर परिसर, डोंगररांगा आणि जंगलाचा परिसर व्यापला होता. त्यामुळे धार्मिक वातावरणाला निसर्गसौंदर्याची अनोखी किनार लाभली होती.
दर्शनाबरोबरच हनुमान तळे, गुप्त भीमाशंकर, कोकणकडा तसेच परिसरातील धबधबे पाहण्यासाठी भाविक व पर्यटकांनी गर्दी केली होती. पावसाच्या सरी अंगावर झेलत आणि धुक्यात चिंब होत निसर्गाचा आनंद लुटताना भाविक दिसत होते. यात्रेतील गर्दीचे नियोजन देवस्थानचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे, सरपंच दत्तात्रय हिले व देवस्थानचे विश्वस्त करीत होते. एसटी वाहतुकीचे नियोजन मारुती खळदकर यांनी केले.
महसूल विभागाचे मंडलाधिकारी व तलाठी उपस्थित होते. घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चार वाहनतळांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहनतळ ते बसस्थानक या मार्गावर भाविकांच्या वाहतुकीसाठी एसटी बस तसेच खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर परिसर व पायर्यांची स्वच्छता स्वयंसेवक आणि आळंदी संघाच्या कर्मचार्यांकडून करण्यात आली.
चारही सोमवार पोलीस पाटलांची सेवाभावी उपस्थिती
घोडेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील महिला व पुरुष पोलीस पाटील यांनी श्रावणातील चारही सोमवारी भीमाशंकर यात्रेच्या बंदोबस्तात सक्रिय सहभाग घेतला. भाविकांना मार्गदर्शन, गर्दी नियंत्रण आणि सुरक्षिततेसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.





