Pune Crime: तोतया पत्रकारावर 10 लाखांच्या खंडणीचा गुन्हा दाखल; थेट राखीव पोलीस निरीक्षकाला धमकावले
Pune Crime: राखीव पोलीस निरीक्षकाला नोकरी घालविण्याची धमकी; खोटी बातमी प्रसिद्ध करून बदनामी केल्याचा आरोप

पुणे : स्वतःला टाईम्स ऑफ महाराष्ट्रचा पत्रकार असल्याचे सांगत राखीव पोलीस निरीक्षकाला धमकावून दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुजम्मील शेख याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राखीव पोलीस निरीक्षक भगवान विजयराव टोणे (वय ५७) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा क्रमांक २१३/२०२६ बीएनएस कलम ३०८(२), २२४, ३५१(२) आणि ३५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
फिर्यादीनुसार, ४ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आरोपी मुजम्मील शेख याने पोलीस मुख्यालय, लोहमार्ग, पुणे येथील नियमित ड्रिल सरावाबाबत माहिती मिळवून फिर्यादीला व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला.
त्यानंतर शिवाजीनगर येथील हॉटेल प्राईड येथे बोलावून काही अर्धवट छायाचित्रे दाखवत, “तुमच्याविरोधात बातमी प्रसिद्ध करून नोकरी घालवतो,” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.
तसेच ही बाब दडपण्यासाठी आरोपीने दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या व्हॉट्सअॅपवर बदनामीकारक बातमीची हेडलाईन पाठवून दबाव टाकण्यात आला.
त्यानंतर फिर्यादीविरोधात खोटी बातमी प्रसिद्ध करून त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी, यासाठी प्रयत्न केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. जाधव हे करत आहेत. गुन्ह्याची नोंद सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. घाटे यांनी केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
हेही वाचा:
Sanjay Raut: “मोदींनी अमित शाह यांना उपपंतप्रधान करण्यास नकार दिला”; संजय राऊतांचा मोठा दावा





