Ghatkopar Landslide: …अन् काही क्षणांतच सगळं उद्धवस्त! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळून दोघांचा मृत्यू
Ghatkopar Landslide: मृतांच्या नातेवाईकांना ३ लाखांची मदत जाहीर

Ghatkopar Landslide: मुंबईतील घाटकोपर भागात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. अशोक नगरमधील गौसिया चाळीतील दोन ते तीन घरांवर दरडीचा ढिगारा कोसळला आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन ते चार जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी पहाटे ३:४८ च्या सुमारास या घटनेची नोंद झाली. चिराग नगर भागातील राठोड मेडिकलजवळ ही दरड कोसळली आणि त्याचा ढिगारा गौशिया चाळीवर पडला. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना ३ लाखांची मदत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जाहीर केली आहे.
या घटनेनंतर पालिकेचे अग्निशामक दल, पोलीस, वॉर्ड कर्मचारी, संबंधित वीज वितरण कंपनी आणि १०८ रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या संशयित रहिवाशांचा शोध घेण्यासाठी आपत्कालीन पथकांकडून सध्या बचावकार्य वेगाने सुरू आहे.
४ ते ५ जण अडकल्याची शक्यता
पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार “पावसामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोकनगर भागात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. आतापर्यंत दोन बॉडी बाहेर काढण्यात आल्या असून बचावकार्य सुरु आहे. ही घटना पहाटे पावणे चार वाजताच्या सुमारास घडली. यात ४ ते ५ जण अडकल्याची शक्यता आहे.”
सतत कोसळणारा पाऊस आणि मध्यरात्रीचा अंधार यामुळे सुरुवातीला मदतकार्यात मोठे अडथळे आले. मात्र, सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे जवान ढिगाऱ्याखालून एकेका जीवाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, मुंबईत परिसरात मंगळवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे काही रस्त्यांवर पाणी साचलेले होते, याचा परिणाम मुंबईच्या रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे.





