Pune Congress Protest : ‘खड्डे मे बर्थडे’, थेट खड्ड्यात केक कापत काँग्रेसचे अभिनव आंदोलन
Pune Congress Protest : ‘पुणे गेले खड्ड्यात... या प्रशासनाचे काय करायचे?’

पुणे : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी स्वारगेट येथे ‘खड्डे मे बर्थडे’ हे अभिनव आंदोलन केले. स्वारगेट येथील पीएमपीएमएल डेपोसमोर रस्त्यावरील खड्ड्यातच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी ‘विकास गेला खड्ड्यात’ असा उपरोधिक संदेश देत विटी-दांडू, गोट्या आदी पारंपरिक खेळही खेळण्यात आले. प्रदेश काॅग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी या आंदोलनाचे आयोजन केले होते.
शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत असून, वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यांच्या निकृष्ट कामांमुळे पुणेकरांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
रस्ते विकासाचे हवे होते; मिळाले मात्र खड्ड्यांचे गिफ्ट, असा टोला लगावत काँग्रेस कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचे बजेट खर्च केले जाते; मात्र त्यानंतरही रस्त्यांची अवस्था सुधारत नसल्याने ठेकेदारांच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनीही आंदोलनाला प्रतिसाद देत ‘पुणे गेले खड्ड्यात… या प्रशासनाचे काय करायचे?’ अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. या आंदोलनात माजी महापौर अंकुश काकडे, शिव मंत्री, ऋषिकेश बालगुडे यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Compressed Biogas Production: ३०० टन ओल्या कचऱ्यावर मोफत प्रक्रिया? बीपीसीएलकडून तयारी





