विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आणू शकत नाही ! नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली – परीक्षा घेण्याच्या दोन दिवस आधी ती पुढे ढकलण्याचे आदेश आम्ही देऊ शकत नाहीत. आम्ही अशी परीक्षा कशी पुढे ढकलू शकतो? आजकाल फक्त परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करतात. आम्ही शैक्षणिक तज्ज्ञ नसून लाखो विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आणू शकत नाही, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला.
या प्रकरणी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या. मनोज मिश्रा आणि न्या. जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठाने शुक्रवारी सुनावणी पार पडली. नीट-पीजी परीक्षा सुरुवातीला 23 जून रोजी होणार होती,पण अनियमिततेच्या कारणास्तव खबरदारी म्हणून ११ ऑगस्ट रोजी पुढे ढकलण्यात आली होती. यानंतर ही परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याची मागणी करत याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, आपण आत्ता नीट पीजी परीक्षा स्थगित करू शकत नाही. ही परीक्षा येत्या रविवारीच (११ ऑगस्ट) घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान, देशातील १७० शहरांमधील ४१६ परीक्षा केंद्रांवर नीट पीजी परीक्षा आयोजित करेल. ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाईल. यंदा २,२८,५४२ विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत.





