T20 World Cup 2026 : भारत-पाकिस्तानच्या बळावर कॅनडाचा सलग दुसऱ्या टी-२० विश्वचषकात प्रवेश! आता फक्त ७ जागा शिल्लक

Canada Qualifies for ICC T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यांत भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित होणार आहे. या टी-२० विश्वचषकासाठी कॅनडा संघाने देखील पात्रता मिळवली आहे. कॅनडाने अमेरिका विभागीय पात्रता फेरीत सलग पाच सामने जिंकले, ज्यामुळे त्यांनी या मोठ्या स्पर्धेत स्थान निश्चित केले आहे.
टी-२० विश्वचषकासाठी १३ संघ निश्चित, ७ जागा शिल्लक –
कॅनडाने आपल्या अंतिम सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला. किंग सिटी येथील मेपल लीफ नॉर्थ-वेस्ट मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान कॅनडाने बहामासच्या संघाला अवघ्या ५७ धावांत सर्वबाद केले. कलीम सना आणि शिवम शर्मा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. प्रत्युत्तरात कॅनडाने ५.३ षटकांतच लक्ष्य गाठले. दिलप्रीत बाजवा याने १४ चेंडूत नाबाद ३६ धावा केल्या.
The road to ICC Men’s #T20WorldCup 2026 is heating up with 13 teams now locked in 🔥
— ICC (@ICC) June 22, 2025
या पात्रता स्पर्धेत सहभागी झालेल्या कॅनडा संघात भारत आणि पाकिस्तान वंशाच्या खेळाडूंची संख्या लक्षणीय आहे. कर्णधार निकोलस किर्टन, एरॉन जॉन्सन आणि डिलन हेलिगर यांना वगळता, उर्वरित १६ खेळाडूंचा संबंध भारत आणि पाकिस्तानशी आहे. या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कॅनडा सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकात खेळणार आहे.
हेही वाचा – Rohit Sharma : हिटमॅनला आयुष्यात कोणत्या गोष्टीचा आहे पश्चात्ताप? स्वत:च केला खुलासा, पाहा VIDEO
कॅनडा संघाने अमेरिका प्रादेशिक पात्रता स्पर्धेत सुरुवातीपासूनच उत्कृष्ट कामगिरी केली. पहिल्या सामन्यात त्यांनी बर्म्युडाला ११० धावांनी पराभूत केले. त्यानंतर केमॅन आयलंड्सला ५९ धावांनी हरवले. पहिल्या फेरीतील सामन्यात कॅनडाने बहामासचा १० गडी राखून पराभव केला. त्यानंतर केमॅन आयलंड्सविरुद्ध त्यांनी ४२ धावांनी आणखी एक विजय मिळवला.
हेही वाचा – IND vs ENG : जैस्वालच्या चुकीमुळे टीम इंडिया अडचणीत, गावस्करांनी सुनावले खडेबोल!
कॅनडा हा २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरलेला १३वा संघ आहे. सह-यजमान भारत आणि श्रीलंका यांच्यासह अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडीज, आयर्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघांनीही या स्पर्धेसाठी प्रवेश मिळवला आहे. १३ संघ निश्चित झाले असून, उर्वरित सात संघांचा निर्णय होणे बाकी आहे. यापैकी दोन संघ युरोपियन पात्रता फेरीतून (५-११ जुलै), दोन संघ आफ्रिका पात्रता फेरीतून (१९ सप्टेंबर-४ ऑक्टोबर) आणि तीन संघ आशिया-ईएपी पात्रता फेरीतून (१-१७ ऑक्टोबर) २०२६ च्या पुरुष टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरतील.





