माधुरी तळवलकर
“प्रेरणा’ ही कथा आहे, एका अथक लढाईची आणि जिद्दीची. डॉ. उज्ज्वला सहाणे यांनी “प्रेरणा ः द साउंड ऑफ सायलेन्स…’ या पुस्तकातून त्यांच्या कुटुंबाच्या संघर्षाची कथा सांगितली आहे. श्रीमंत कुटुंबातील उज्ज्वला आंतरधर्मीय विवाह करते.
त्यांना सुरेख मुलगी होते आणि काही महिन्यांतच मुलीला म्हणजे प्रेरणाला पॅरालिसिसचा ऍटॅक येतो. हे दोघे शिक्षक. नोकरी सोडून चालणार नसते. संस्थाचालकांचे कायम अडवणुकीचे धोरण. सासर-माहेरचा आधार नाही. मुलीच्या आजारपणाचा धक्का. डॉक्टरांचे विचित्र अनुभव.
प्रेरणाला उभंसुद्धा राहता येणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितल्यावरही आईवडील चिकाटीनं सतत प्रयत्न करीत राहिले. ती नुसती उभी राहिली नाही; तर धावू लागली, नाचू लागली. मात्र ती कर्णबधिर झाली. अगदी साध्यासाध्या गोष्टींमध्ये या मुलांची कुचंबणा होते. मुख्य म्हणजे अशा व्यक्तींचा सभोवतालच्या जगाशी संपर्क तुटतो. स्वतःच्या भावनाही व्यक्त करता येत नाहीत.
परिसरातील आवाज, शब्द सतत कानावर पडल्यावर त्यातून इतर मुलांचे सहज-शिक्षण होत जाते. पण मूकबधिर मुलांना अभ्यास शिकवणं महाकठीण. पाच-पाच, सहा-सहा तास अभ्यास करूनही अशा मुलांचे आकलन फार थोडे होते आणि लक्षात तर त्याहूनही कमी राहते.
अशा मुलांच्या शाळा, स्पीच थेरपी शिकवणारे शिक्षक फक्त पुण्यात होते.
पुण्यात नोकरी द्यायची नाही, गुणवत्तेनुसार पद द्यायचे नाही असा संस्थाचालकांचा हेका. यातून या कुटुंबाची खूप ससेहोलपट झाली. पण दोघेही हरले नाहीत, थांबले नाहीत. यातूनच प्रेरणा बारावी झाली. सुदैवाने शुमिता चटर्जी नावाच्या नृत्यशिक्षिका प्रेरणाला भेटल्या आणि तिथून प्रेरणाच्या जीवनाला कलाटणी मिळते.
अनेक संकटं, अपयश, दुःखद अनुभव यांच्यावर मात करीत प्रेरणा व तिचे आईबाबा पुढेपुढे जात राहतात. प्रेरणा नृत्यप्रवीण होते. या साऱ्यातून त्यांचे पती केशव यांच्या आग्रहामुळे उज्ज्वलाताई आपले शिक्षण पुढे चालू ठेवतात व पीएचडी होतात. दोघे मिळून स्वतःचे घर बांधतात. जिथे जातील तिथे माणसं जोडतात. पुढे सासर-माहेरचेही लोक त्यांना आपलं मानतात.
डॉ. उज्ज्वला सहाणे यांचे व्यक्तिमत्त्व रसिक, धीट, जबरदस्त आशावादी असल्याचे या पुस्तकातून जाणवते. केवळ स्वतःच्या कर्णबधिर मुलीचे आयुष्य उभे करून त्या थांबत नाहीत. अशी मुलं असलेली घरं शोधून त्यांच्या पालकांना जागृत करतात, त्यांना मार्गदर्शन करतात. या प्रवासात त्यांना अनेक सुहृद भेटले. त्यांची व्यक्तिचित्रं छान रेखाटली आहेत.
आज प्रेरणा हिला राष्ट्रीय पुरस्कार व अनेक मानसन्मान मिळाले आहेत. सहाणे यांनाही त्यांच्या अथक संघर्षाला दाद देणारे पुरस्कार मिळालेत. “प्रेरणा ः द साउंड ऑफ सायलेन्स…’ या पुस्तकाला राज्य पुरस्कार मिळालेला आहे. रसरशीत शैलीतले हे पुस्तक उज्ज्वला सहाणे यांनी स्वतः प्रकाशित केले असून त्याची आता तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे.