International Film Festival Goa : सिनेरसिकांसाठी मोठी पर्वणी.! गोव्यात ९ दिवस जागतिक सिनेमाचा जल्लोष; ‘IFFI’चा पडदा २० नोव्हेंबरला उघडणार
५७वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत गोव्यात आयोजित करण्यात आला आहे. ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ अर्थात ‘सीमांच्या पलीकडच्या कथा’ ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना आहे.

International Film Festival Goa : जगभरातील चित्रपटसृष्टीचे लक्ष आता गोव्याकडे लागले आहे. विविध देशांतील चित्रपट, वेगवेगळ्या भाषांमधील कथा, नामवंत दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या उपस्थितीत नोव्हेंबरमध्ये गोव्याची भूमी जागतिक सिनेमाच्या उत्सवाने गजबजणार आहे. निमित्त आहे ५७व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI).
यंदा या महोत्सवात केवळ मनोरंजनाची मेजवानीच मिळणार नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील संस्कृती, सामाजिक वास्तव, मानवी भावना आणि वेगवेगळ्या विचारविश्वांचा अनुभवही प्रेक्षकांना घेता येणार आहे.
विशेष म्हणजे, भारताच्या ‘रामायण’ चित्रपटाला ब्रिक्स विशेष विभागात स्थान मिळाले असून, ‘धुरंधर’ आणि ‘बिकमिंग’ या चित्रपटांमुळे ‘इंडियन पॅनोरमा’ विभागाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे यंदाचा इफ्फी भारतीय चित्रपटसृष्टीसाठीही विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
५७वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत गोव्यात आयोजित करण्यात आला आहे. ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ अर्थात ‘सीमांच्या पलीकडच्या कथा’ ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना आहे.
या संकल्पनेतून चित्रपटांना भाषा, देश आणि संस्कृतीच्या सीमा ओलांडून माणसांना जोडण्याची ताकद असल्याचा संदेश दिला जाणार आहे. यंदाच्या महोत्सवासाठी १३७ देशांमधून १,९०० हून अधिक चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. त्यातून ८६ देशांतील १५० हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जागतिक चित्रपट समुदायाच्या स्वागतासाठी राज्य सज्ज असल्याचे सांगितले. चित्रपट महोत्सव हा गोव्याच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
महोत्सवाचे संचालक आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनीही चित्रपटांच्या माध्यमातून जगभरातील संस्कृतींना जोडण्याच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकला. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून, वेगवेगळ्या समाजांचे विचार, परंपरा आणि भावना समजून घेण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘फादरलँड’ने होणार महोत्सवाची सुरुवात :
यंदाच्या इफ्फीचा उद्घाटनाचा चित्रपट म्हणून पोलिश दिग्दर्शक पावेल पावलीकोव्स्की यांचा ‘फादरलँड’ प्रदर्शित होणार आहे. युद्धानंतरच्या विभागलेल्या जर्मनीच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा नोबेल पुरस्कार विजेते लेखक थॉमस मान आणि त्यांची मुलगी एरिका यांच्या प्रवासाभोवती फिरते.
‘आय मॅटर’ हा चित्रपट मध्य महोत्सवी चित्रपट म्हणून दाखवण्यात येणार आहे. तर सिंगापूरचे दिग्दर्शक अँथनी चेन यांच्या ‘वी आर ऑल स्ट्रेंजर्स’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होणार आहे.






