Rahul Gandhi : “पंतप्रधान मोदींचे राजकीय करिअर संपुष्टात येईल”; फोन टॅप प्रकरणावर राहुल गांधी स्पष्टच बोलले…
तुम्ही मला कृषी कायदे, व्होट चोरी, एसआयआर, चीन, जनरल नरवणे यांचे पुस्तक आणि एपस्टीन प्रकरणावर बोलू दिले नाही. मला लांबलचक भाषणांची चर्चा नको आहे, तर समोरासमोर चर्चा हवी आहे.

Rahul Gandhi – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुल्या चर्चेचे आव्हान देत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधानांवरील सर्व आरोपांचे पुरावे आपल्या फोनमध्ये असून, पंतप्रधान स्वतः आपला फोन टॅप करत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.
तसेच, आपल्याशी समोरासमोर चर्चा केल्यास पंतप्रधान मोदींचे राजकीय करिअर संपुष्टात येईल, असा दावाही त्यांनी केला आहे. दुसरीकडे, राहुल गांधी हे संसदेतील चर्चेपासून पळ काढत असल्याचा पलटवार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.
इन्स्टाग्रामवरील आस्क मी सत्रादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी आपली भूमिका मांडली. चर्चा संसदेत होऊ शकते असे भाजपचे म्हणणे असताना सार्वजनिक चर्चेचा आग्रह का धरला जात आहे, या प्रश्नावर गांधी म्हणाले की, त्यांना सभागृहात बोलू दिले जात नाही आणि त्यांचा माइकही बंद केला जातो.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, तुम्ही मला कृषी कायदे, व्होट चोरी, एसआयआर, चीन, जनरल नरवणे यांचे पुस्तक आणि एपस्टीन प्रकरणावर बोलू दिले नाही. मला लांबलचक भाषणांची चर्चा नको आहे, तर समोरासमोर चर्चा हवी आहे. एका बाजूला नरेंद्र मोदी असतील आणि दुसऱ्या बाजूला मी असेन; त्यांनी माझ्यावर आरोप करावेत आणि मी त्यांच्यावर करेन.
या चर्चेचे परीक्षक म्हणून उद्योगपती गौतम अदानी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची नियुक्ती केली तरी आपली काहीही हरकत नसेल, मात्र या चर्चेनंतर मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत, याची आपण हमी देतो.
या सत्रातील दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी दावा केला की, त्यांच्या सर्व आरोपांचे पुरावे त्यांच्या फोनमध्ये आहेत आणि हा फोन पंतप्रधान टॅप करत आहेत. परदेशी शक्तींचे कोणावर नियंत्रण आहे आणि खरा देशद्रोही कोण आहे, हे या समोरासमोरच्या चर्चेतून देशाला समजेल.
समाजमाध्यम एक्सवर एक व्हिडिओ आणि हिंदीतून पोस्ट शेअर करत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. मोदीजी, तुमच्याच माध्यमांच्या दिवाळी स्नेहसंमेलनातही तुम्ही टेलिप्रॉम्प्टरचा वापर केला? लोक तुमचे, व्यासपीठ तुमचे, तरीही तुम्हाला स्क्रिप्टची गरज भासते.
दबाव वाढल्याचे दिसत आहे. हरकत नाही, माझ्यासोबतच्या चर्चेलाही टेलिप्रॉम्प्टर घेऊन या आणि तुमच्या पसंतीचा परीक्षक बसवा, फक्त चर्चेला या, असे आव्हान त्यांनी दिले. मोदींच्या मनात भीती असल्याने त्यांनी आपल्यावर टीका करणे बंद केले आहे, असा दावाही त्यांनी केला.
भाजपचे प्रत्युत्तर…
दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधी यांचे हे आव्हान फेटाळून लावत ते संसदेतील चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, राहुल गांधी पंतप्रधानांना चर्चेचे ठिकाण निवडण्यास सांगत आहेत, मात्र चर्चेसाठी संसदेचे व्यासपीठ आधीच अस्तित्वात आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनी थोडे गांभीर्य आणि जबाबदारी दाखवावी, असा टोलाही सीतारामन यांनी लगावला आहे.






