Sonalee Kulkarni : प्रसिद्ध राजकारण्यासोबत लग्न अन् राहायला आलिशान घर.! सोनाली कुलकर्णी नेमकं काय म्हणाली….
या चर्चेने इतके टोक गाठले होते की सोनालीचे एका प्रसिद्ध राजकारण्यासोबत लग्न झाले असून त्या राजकारण्याने तिला राहण्यासाठी घरही दिले आहे.

Sonalee Kulkarni : मराठी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाने आणि स्पष्टवक्तेपणाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. आपल्या दमदार भूमिका, सौंदर्य आणि बेधडक स्वभावामुळे सोनाली नेहमीच चर्चेत असते.
मात्र, एकेकाळी तिच्या अभिनयाची नाही, तर थेट वैयक्तिक आयुष्याचीच जोरदार चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे, या चर्चेने इतके टोक गाठले होते की सोनालीचे एका प्रसिद्ध राजकारण्यासोबत लग्न झाले असून त्या राजकारण्याने तिला राहण्यासाठी घरही दिले आहे, अशी अफवा पसरली होती.
ही चर्चा ऐकून खुद्द सोनालीही चक्रावून गेली होती. नातेवाईकांपासून ते जवळच्या मित्रपरिवारापर्यंत अनेकांनी तिला फोन करून या लग्नाबाबत विचारणा केली होती. अखेर एका मुलाखतीत सोनालीने या अफवेवर मौन सोडत घडलेला मजेशीर किस्सा सांगितला.
राजकारण्यासोबत लग्नाची अफवा, सोनालीने सांगितला मजेशीर किस्सा!
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नुकतंच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिच्या आयुष्यातील अनेक किस्स्यांवर गप्पा रंगल्या. याच मुलाखतीदरम्यान तिला वैयक्तिक आयुष्याबद्दल पसरलेल्या एका अफवेविषयी विचारण्यात आले. त्यावर सोनालीने कोणताही आडपडदा न ठेवता हा मजेशीर किस्सा सांगितला.
सोनाली म्हणाली की, एकेकाळी तिचे एका राजकारण्यासोबत लग्न झाल्याची चर्चा सुरू झाली होती. एवढेच नाही, तर त्या राजकारण्याने तिला राहण्यासाठी घर दिल्याचीही अफवा पसरली होती. ही बातमी इतकी पसरली की अनेकांनी तिला फोन करून थेट लग्नाबाबतच विचारणा करण्यास सुरुवात केली.
या अफवेचा सर्वात मजेशीर भाग म्हणजे सोनालीच्या चुलत बहिणीनेही तिला फोन करून, ‘काय तुझं लग्न झालंय का?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर सोनालीने तिला मिश्किलपणे उत्तर दिले. ‘अगं, माझं लग्न झालं तर मी तुला लग्नाला बोलवेन.
बहिण आहेस माझी तू,’ असे ती म्हणाली. मात्र, तिच्या बहिणीनेही ‘अगं, होऊ शकतं’ असे उत्तर दिले. हा किस्सा सांगताना सोनालीने स्पष्ट केले की, या सगळ्या निव्वळ अफवा होत्या. प्रत्यक्षात या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नव्हते.
दरम्यान, सोनाली कुलकर्णीच्या अभिनय कारकिर्दीबद्दल सांगायचे झाल्यास, तिने ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटापासून तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर तिने एकापेक्षा एक वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत मराठी मनोरंजनविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
‘नटरंग’, ‘मितवा’, ‘क्लासमेट्स’, ‘पोश्टर गर्ल’, ‘हिरकणी’, ‘पांडू’ आणि ‘झिम्मा’ यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिका विशेष गाजल्या. केवळ मराठी चित्रपटांपुरते मर्यादित न राहता तिने हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले आहे.







