Pakistani cosmetic : महिलांनो सावधान.! पाकिस्तानी कॉस्मेटिक्सचा भारतात सुळसुळाट; ‘मेड इन पाकिस्तान’ कॉस्मेटिक्समध्ये आढळले विषारी धातू
सौंदर्यप्रसाधनांद्वारे पारा आणि आर्सेनिकच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास त्वचेचे गंभीर विकार, मूत्रपिंडाचे नुकसान आणि मज्जासंस्थेशी संबंधित गंभीर गुंतागुंत उद्भवू शकते.

Pakistani cosmetic – नांदेड पोलिसांनी सुमारे चार महिन्यांपूर्वी जप्त केलेल्या मेड इन पाकिस्तान असा उल्लेख असलेल्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये पारा आणि आर्सेनिक यांसारख्या विषारी जड धातूंचे प्रमाण अत्यंत धोकादायक पातळीवर आढळून आले आहे.
शासकीय प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली असल्याचे एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले.
९ जुलै रोजी नांदेडमधील मक्का गल्ली परिसरातील अफरा कलेक्शन येथे छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत सुमारे ३९.६९ लाख रुपये किमतीची संशयास्पद सौंदर्यप्रसाधने जप्त करण्यात आली होती.
दुकान चालक मोहम्मद झियाउद्दीन मोहम्मद वाजिद याच्या ताब्यातून ही उत्पादने हस्तगत करण्यात आली होती. या बनावट आणि विषारी उत्पादनांमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सौंदर्यप्रसाधनांद्वारे पारा आणि आर्सेनिकच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास त्वचेचे गंभीर विकार, मूत्रपिंडाचे नुकसान आणि मज्जासंस्थेशी संबंधित गंभीर गुंतागुंत उद्भवू शकते.





