भाजपचा २०२९ साठी मास्टरप्लॅन.! रविंद्र चव्हाणांच्या खेळीने मित्रपक्षांची चिंता वाढणार? विरोधकांचा बुरुज ढासळणार?

मुंबई : भाजपने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत १३२ जागांवर यश मिळवले होते. आता २०२९ च्या निवडणुकीसाठी पक्षाने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. माजी मंत्री आणि डोंबिवलीचे चार वेळा आमदार रविंद्र चव्हाण यांनी नुकतंच प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेत आक्रमक रणनीती आखण्यास सुरुवात केली.
माजी आमदार आणि विरोधी पक्षांच्या बलाढ्य नेत्यांना पक्षात सामील करून घेण्याचा सपाटा लावत भाजपने मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांना अस्वस्थ केले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या ‘शतप्रतिशत भाजप’ या स्वबळाच्या नाऱ्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पक्षाने मिशन २०२९ ची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
बहुमत मिळवण्यासाठी मित्रपक्षांना कात्री?
२०२४ च्या निवडणुकीत भाजपने शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत महायुतीच्या माध्यमातून २३५ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. मात्र, स्वबळावर बहुमताचा आकडा (१४५) गाठण्यात भाजपला यश आले नाही. २०१४ मध्ये १२२, २०१९ मध्ये १०५ आणि २०२४ मध्ये १३२ जागा जिंकूनही भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही. यामुळे २०२९ मध्ये स्वबळावर बहुमत मिळवण्यासाठी पक्षाने मित्रपक्षांच्या मतदारसंघांमध्ये ताकद वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न सुरू केला आहे.
मित्रपक्षांना धक्का देत बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश
रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपने शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या मतदारसंघांतील विरोधी पक्षांच्या तगड्या नेत्यांना पक्षात सामील करून घेण्याची रणनीती अवलंबली आहे. यामुळे मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
- इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात अपक्ष लढलेले प्रवीण माने यांना भाजपने पक्षात घेतले.
- भोरचे अजित पवार यांचे आमदार शंकर मांडेकर यांच्या विरोधात लढलेले काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांना देखील भाजपने पक्षात घेतेले. थोपटे कुटुंबाचे या मतदारसंघावर दशकानुदशके वर्चस्व आहे.
- पाटणचे शिंदेसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात शरद पवार गटाचे माजी आमदार सत्यजित पाटणकर यांना भाजपने सामील करून घेतले.
- अलिबागचे शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या मतदारसंघातील शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांनी भाजपचे कमळ हाती घेतले.
- पुरंदर मतदारसंघाचे शिंदेसेनेचे आमदार विजय शिवतारे यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
- जालना मतदारसंघाचे शिंदेसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांचे कट्टर विरोधक आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना भाजपने पक्षात घेतले.
ही रणनीती मित्रपक्षांना कमजोर करण्यासोबतच विरोधी पक्षांना खिळखिळे करण्यासाठी आहे. काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसारख्या महाविकास आघाडीच्या पक्षांना कमजोर करण्यासाठी भाजपने त्यांच्या बलाढ्य नेत्यांना लक्ष्य केले आहे.
शिवसेना हाच भाजपसाठी मोठा अडथळा?
२०२९ मध्ये शिंदेसेना हाच भाजपसाठी सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो, कारण दोन्ही पक्षांचा मतदारवर्ग आणि विचारधारा समान आहे. शिंदेसेनेच्या मतदारसंघांमध्ये तगडे उमेदवार उभे करून भाजपने त्यांना आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवली मतदारसंघात विशेषत: कोंकण आणि ठाणे परिसरात शिंदेसेनेचा दबदबा आहे, येथूनच याची सुरुवात झाली आहे. यामुळे शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
भाजपची २०२९ ची रणनीती काय?
- २०१४ मध्ये भाजपने स्वबळावर १२२ जागा जिंकल्या, पण तुल्यबळ उमेदवार आणि तयारीच्या अभावामुळे बहुमत गाठता आले नाही. शिंदेसेनेच्या ६३ जागांसह युती करून सत्ता स्थापन केली.
- २०१९ मध्ये शिवसेनेसोबत युतीत लढताना १०५ जागा मिळाल्या, पण मुख्यमंत्रिपदावरून वाद झाल्याने शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन केली.
- २०२४ मध्ये महायुतीत शिंदेसेना (५७ जागा) आणि अजित पवार गटाने (४१ जागा) लढताना भाजपने १३२ जागा जिंकल्या, पण स्वबळावर बहुमत मिळाले नाही.
आता २०२९ साठी भाजपने तुल्यबळ उमेदवार तयार करण्यावर भर दिला आहे. रविंद्र चव्हाण यांच्या नियुक्तीमुळे पक्षाने मराठा समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, जो मराठा आरक्षण आंदोलनामुळे गेल्या काही वर्षांत चर्चेत आहे. चव्हाण यांच्या नेतृत्वात पक्षाने ३५५ तालुके आणि ३६ जिल्ह्यांमध्ये संघटन मजबूत करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.





