पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने! फडणवीसांच्या घोषणेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले…

Ajit Pawar : राज्यातील २९ महापालिकांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेत त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आम्ही वेगवेगळे निवडणुकीला सामोरे जाऊ, अशी घोषणा पुण्यातून केली.
सोमवारी १५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी ही घोषणा केली. यामुळे या निवडणुकीत पुनरागमन करणे अजित पवार यांच्यासाठी मोठे आव्हान असणार आहे. फडणवीसांनी केलेल्या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
काही ठिकाणी भाजप शिवसेना युती होईल, काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी अशी युती होईल. पुण्यात भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार समोरासमोर लढेल. ही मैत्रीपूर्ण लढत असेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. तसेच त्यांनी राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने आनंदही व्यक्त केला.असे करण्यामागेचे कारणही फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले, शिवसेना शक्यतो बहुतांश ठिकाणी आमच्या सोबत आहे. परंतु, पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादीही ताकदवान आहे. अशा स्थितीत आम्ही सगळेच जर एकत्रित लढलो तर आमच्या प्रतिस्पर्ध्यांना फायदा होऊ शकतो, त्यामुळे आमच्यात मैत्रीपूर्ण लढत होईल.
अजित पवार यांची प्रतिक्रिया
आता फडणवीसांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी केलेल्या घोषणेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शेवटी ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यांना योग्य वाटतं ते स्टेटमेंन्ट त्यांनी केलेलं आहे. मला त्यांनी काय सांगितलंय ते माहिती नाही; परंतु, त्यांनी सागितलं म्हणजे चर्चा होऊनच ते बोलले म्हणूनच तर त्यांनी सांगितलं, असे अजित पवार म्हणाले.
तसेच त्यांनी बोलताना सांगितले की, पण एक सांगतो त्यांनी सांगितलं म्हणजे विचारपूर्वकच सांगितलं असणार आहे. ठीक आहे, बरोबर. अशी हसून प्रतिक्रिया त्यांनी दिली. महापालिका निवडणुकांच्या रणनितीच्या प्रश्नावर अजित पवार यांनी रणनिती निवडणुका लढवायची असणार असल्याचे उत्तर दिले.





