मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर; अतिवृष्टी झालेल्या भागाची करणार पाहणी

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. पावसाचा जोर वाढला आणि धो-धो पावसाने नदीला पूर आला, त्यामुळे नागरिकांना पुन्हा स्थलांरीत करण्याची वेळ आली.
अतिवृष्टीमुळे पुण्यात अनेक भागात नुकसान झाले आहे. या भागातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात येणार आहेत. यावेळी नागरिकांशी मुख्यमंत्री संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
एकतानगर आणि काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती, अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. या ठिकाणी शिंदे भेट देणार आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती होती. मात्र दिल्ली दौरा रद्द करत ते पुण्यातील पुरपरिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आजच्या पुणे दौऱ्याचे नियोजन कसे असणार ?
– दुपारी 12 वा. पुणे विमानतळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन होणार आहे.
– त्यानंतर 12.50 वा पुण्यश्लोक अहिल्यादेवी मनपा शाळा जुनी सांगवी येथे पुरग्रस्त भागाची पाहणी व पुरग्रस्तांशी चर्चा करणार.
– पाटील इस्टेट शिवाजी नगर येथे 1.10 वा पुरग्रस्त भागाची पाहणी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय पीएमसी कॉलनी वाकडेवाडी येथील पुरग्रस्तांशी चर्चा करणार.
– 1.25 वा. एकता नगर सिंहगड रोड परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी व नागरिकांसोबत संवाद साधतील.
– 1.40 सर्कीट हाउस येथे वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील व त्यानंतर पत्रकार परिषद घेतील.
– त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2.15 वा. मुंबईकडे होणार रवाना होतील.
दरम्यान, शहराच्या धरणसाखळीतील चारही धरणे भरली आहेत. तर गेल्या २४ तासांत जोरदार पावसामुळे या चारही धरणांतून विसर्ग सुरू असल्यामुळे खडकवासला धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येत आहे. सायंकाळी सात वाजता धरणातून ४५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. त्यामुळे नदीला पुर आला होता.
मात्र आज सोमवारी पावसाने उघडिप दिली आहे. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पुण्यातील पानशेत, वरसगाव आणि खडकवासला धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला आहे.
हेही वाचा:
“शरद पवारांनीच महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये” ; राज ठाकरेंचा खोचक टोला





