पुणे – सलग चार वेळा नगरसेवक राहिलेल्या, महापालिकेतील विविध समित्यांसह महापौर पदही भूषवलेल्या आणि कसबा विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार मुक्ता टिळक यांचे गुरूवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कर्करोगाने खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या 57 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती शैलेश, मुलगी चैत्राली, मुलगा कुणाल, जावई, सून असा परिवार आहे. शुक्रवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत नारायण पेठेतील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भाजपच्या अत्यंत धडाडीच्या, तळागाळासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ख्याती होती. लोकमान्य टिळक यांच्या त्या पणतीसून आहेत. टिळक घराण्याचा वारसा असला, तरी त्यांचा कोणताही अभिनिवेश न ठेवता पक्षाच्या कामातून स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यामुळेच त्या भाजपच्या तिकिटावर महापालिका निवडणुकीत सलग चारवेळा विक्रमी मताधिक्याने नगरसेविका म्हणून निवडून आल्या. भाजपच्या महापालिकेतल्या गटनेत्या, स्थायी समितीच्या सदस्य अशा जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर सन 2017 मध्ये त्या महापौरपदी विराजमान झाल्या होत्या. सदाशिव-नारायण पेठेतील प्रभाग क्रमांक 15 च्या त्या नगरसेविका म्हणून नेतृत्त्व करत होत्या. त्या महापौर असतानाच सन 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या भाजपच्या आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाल्या.
त्यानंतर मार्च 2017 मध्ये त्यांची पुण्याच्या महापौरपदी निवड झाली. सन 2019 पर्यंत त्यांनी हे पद भूषवले. भाजपची एकहाती सत्ता महापालिकेत पहिल्यांदाच आली आणि त्या भाजपच्या पहिल्या महापौर ठरल्या. त्यांची ही कारकीर्दही पुणेकरांच्या कायमच लक्षात राहिली.
उच्चशिक्षित आणि कार्यकुशल नेतृत्त्व
मुक्ताताई यांचे शालेय शिक्षण सौ. विमलाबाई गरवारे महाविद्यालयात झाले. महाविद्यालयीन शिक्षण फर्गसन महाविद्यालयात झाले. तेथे त्यांनी मानसशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. त्यानंतर आयएमडीआर येथून मार्केटिंग या विषयात एमबीए पूर्ण केले. भारतीय विद्या भवन येथून पत्रकारिता पदविका पूर्ण केली. त्याचबरोवर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या जर्मन भाषेच्या विविध परीक्षाही दिल्या आहेत. सुरूवातीच्या काळात मुक्ता टिळक मार्केटिंग आणि मार्केट रिसर्च ऍनेलिस्ट म्हणून विविध कंपन्यांसाठी काम केले. त्यामध्ये प्रामुख्याने हिंदुस्थान पेट्रोलियम, आरबीआय, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, थरमॅक्स, प्रवीण मसाले आदी कंपन्यांमध्ये काम केले आहे.