Bigg Boss 19 Winner : बिग बॉस 19 चा अत्यंत प्रतिक्षित ग्रँड फिनाले रविवारी रात्री मोठ्या दिमाखात पार पडला. संपूर्ण सीझनभर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे स्पर्धक, सलमान खानचे होस्टिंग, नाट्यपूर्ण वाद, भावनिक प्रसंग, मैत्री-भांडणे यांचा अखेरचा टप्पा अतिशय रोमांचक झाला. या सगळ्यांवर मात करत अखेर गौरव खन्ना यांनी बिग बॉस 19 ची विजेतेपदाची ट्रॉफी आपल्या नावावर केली. ट्रॉफीसोबतच गौरवला 50 लाख रुपये नकद बक्षीस देण्यात आले, ज्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. फिनालेच्या सुरुवातीला टॉप 5 मध्ये अमाल मलिक, तान्या मित्तल, प्रणित मोरे, फरहाना आणि गौरव खन्ना असल्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सर्वांचेच फॅनफॉलोइंग मजबूत असल्याने स्पर्धा तगडी होती. जसजसा कार्यक्रम पुढे सरकत गेला तसतसे एकामागोमाग एक स्पर्धक घराबाहेर होत गेले. तान्या मित्तल आणि अमाल मलिक हे सर्वप्रथम बाहेर झाले. त्यानंतर प्रेक्षकांच्या मनातील आवडता स्पर्धक प्रणित मोरे टॉप 3 मध्ये पोहोचल्यानंतरही एविक्ट झाला. अखेरचा सामना गौरव खन्ना आणि फरहाना यांच्या दरम्यान झाला. लास्ट मिनिट लाईव्ह व्होटिंगनंतर गौरवने बाजी मारली आणि विजेतेपद पटकावले. ग्रँड फिनालेमध्ये मनोरंजनाचा तुफान पाऊस पडला. सुरुवातीपासूनच स्टेजवर रंगत आणणारे परफॉर्मन्स, सेलिब्रिटींची एन्ट्री आणि सलमान खानचा दमदार अंदाज यामुळे शो प्रेक्षकांसाठी खास झाला. विशेष आकर्षण ठरली सलमान खान यांची भावुक झालेली प्रतिक्रिया. त्यांनी दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांची आठवण काढत सांगितले की 8 डिसेंबरला त्यांचा वाढदिवस असल्याने मनात अनेक भावना दाटून आल्या. सलमान बोलताना काही क्षण त्यांचा आवाजही भरून आला आणि संपूर्ण सभागृहात शांतता पसरली. फिनालेमध्ये कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांनी त्यांचा आगामी चित्रपट ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ च्या प्रमोशनसाठी आलेले. कार्तिक आणि सलमान यांच्यातील मजेशीर संवाद प्रेक्षकांना खूप आवडला. सलमानने कार्तिकला “नीला नळ, लाल नळ” हा टंग ट्विस्टर बोलण्याचे आव्हान दिले, आणि कार्तिक अडखळल्यावर सेटवर जोरदार हशा पिकला. दोघांनी मिळून चित्रपटातील हुक स्टेपही करून दाखवला. फिनालेमध्ये बिग बॉस 19 चे सर्व माजी स्पर्धकही उपस्थित होते. कुनिका, अशनूर कौर, मृदुल तिवारी, नीलम गिरी यांच्यातील गप्पा, त्यांचे अनुभव आणि एकमेकांशी केलेली मजा यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा संपूर्ण सीझन एकत्र पाहिल्याचा अनुभव आला. अमाल मलिकच्या बाहेर पडण्यावर त्यांचा जवळचा मित्र शहबाज बदेशा भावुक होताना दिसला. त्यांनी शोच्या बाहेर येताच अमालसाठी सातत्याने मतदानाची अपील केली होती, त्यामुळे त्यांचे अश्रू प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. बिग बॉस 19 चा हा सीझन सुरुवातीपासूनच हिट ठरला होता. भांडणांच्या पलीकडे जाऊन अनेक स्पर्धकांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. मैत्री, प्रेम, संघर्ष आणि कमकुवत क्षण प्रेक्षकांनी सर्व पाहिले. अखेरीस, सर्व उतार-चढावांवर मात करत गौरव खन्ना यांनी या सीझनचा ‘किंग’ म्हणून मुकुट चढवला. त्यांच्या शांत आणि स्थिर स्वभावाने, टास्कमधील परफॉर्मन्सने आणि प्रेक्षकांच्या अपार प्रेमामुळे ते या वर्षाचे विजेते ठरले.