मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का! राखी जाधव तुतारी सोडून कमळ हाती घेणार? हालचालींना वेग

Rakhi Jadhav : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहेत. या निवडणुकीसाठी शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत हातमिळणी केल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेसाठी किमान २२ जागा मिळाव्यात, असा आग्रह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने धरला होता. पण यापैकी केवळ १० जागाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मिळाल्याने नाराजीची चर्चा रंगली आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव या शरद पवारांची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या धामधूमीत शरद पवारांसाठी हा मोठा धक्का आहे. ठाकरे गटासोबतच्या आघाडीत कमी जागा मिळाल्यानंतर रविवारी रात्री काहींनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव नाराज असून त्या मोठा निर्णय घेत आपल्या हाती कमळ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. जागावाटपाच्या प्रक्रियेत आपल्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अपेक्षित न्याय न मिळाल्याने राखी जाधव नाराज असल्याचे म्हटले जात असल्याच्या चर्चा आहेत.
मुंबई महापालिकासाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून त्यानंतर दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच पुण्यात प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची साथ सोडत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना पुण्यात मोठा धक्का बसला. दुसरीकडे मुंबईत देखील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चेहरा असलेल्या अध्यक्षा राखी जाधव पक्षातून बाहेर पडणार असल्याने पक्षाचा बुरुजच कोसळल्याचे चित्र आहे.
दरम्यान, अद्यापर्यंत राखी जाधव यांनी भाजपामध्ये जाणार असल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. जाधव यांनी कमळ हाती घेतल्यास ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे बळ वाढेल तर शरद पवार यांच्यासाठी ही धक्कादायक बाब ठरणार आहे.
हेही वाचा : शिवसेनेच्या केंद्रीय राज्यमंत्र्याच्या कारचा भीषण अपघात! समृद्धी महामार्गावरील घटना; तिघे गंभीर, सुदैवाने…





