Uddhav Thackeray : मुंबई महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी तयार केला ‘हा’ मास्टरप्लॅन

मुंबई : काही महिन्यांमध्ये स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका ताब्यात ठेवणे, हा प्रमुख अजेंडा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे. मागची पंचवीस वर्ष बीएमसीवर शिवसेनेनं अधिराज्य गाजवलं, मुंबई महापालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तो कायम ठेवण्यासाठी उबाठा पक्षाने आतापासूनच सुरुवात केली आहे.
‘हि’ मोहीम सुरु केली
‘लढा आपल्या मुंबईचा’ही मोहीम हाती घेऊन शिवसैनिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. ठाकरे गटाने मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली रणनीती अधिक स्पष्ट आणि आक्रमक केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने पुन्हा एकदा मराठी अस्मिता, हिंदुत्व, आणि महाविकास आघाडी या बळावर सत्ता मिळवण्याची मोहीम सुरु केली आहे. ठाकरे गटानं ‘अदानीला घालवूया, मुंबईच्या अस्मितेसाठी लढूया’ या मोहिमेला सुरुवात केली आहे. महिनाभर ही मोहीम सुरु राहणार आहे. मोहीमेच्या माध्यमातून ठाकरे सेना महायुतीला धारेवर धरणार आहे.
या मोहिमेचे नेतृत्व ठाकरे सेनेचे युवानेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे हे करीत आहेत. घरोघर पत्रके वाटप, महिलांची पदयात्रा,पोस्टकार्ड मोहीम,विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वॉर्डस्तरीय संघटन प्रभाग सभांमध्ये संवाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनीही आपल्या भाषणांतून आणि जाहिरातींतून “आपलंच खऱं हिंदुत्व” हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातच बाळासाहेब ठाकरेंच्या जुन्या व्हिडिओ क्लिप्स, भाषणं यांचा वापर केला जात आहे.
कसा आहे उबाठा पक्षाचा मास्टरप्लॅन
१) मुळ मुंबईकरांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करणार.
२) आम्हीच हिंदुत्वाचा चेहरा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची पुन्हा मांडणी करणार.
३) स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीसोबत लढण्याची शक्यता.
४) मराठी मतदारांवर भर देणार.
५) “मराठी माणसाची लढाई” अशी भावना पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न करणार
६) शाखानिहाय मुख्य चौकात फलकबाजी आणि बैठका घेण्यात येणार.
७) शाखानिहाय मुख्य चौकात अदानींविरोधात फलकबाजी आणि बैठक घेतली जाणार.
८) शाखानिहाय राष्ट्रपती यांना अदानी यांच्या विरोधात पोस्ट कार्ड पाठवणार
९) आषाढी एकादशी निमित्त महिला दिंडीचे आयोजन,अदानींना विरोध करणार
१०) खासदार,आमदार यांच्या उपस्थितीत विधानसभानिहाय सामाजिक संस्था, वरिष्ठ नागरीकांच्या बैठका घेणार.
११) 1 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाबाबतीत नागरिकांना माहिती देणार तसेच पत्रक वाटप करणार.





