पुणे/पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची (Maharashtra Politics) घोषणा केली असून, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान आणि १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना पक्षांतराच्या घटनांना वेग आला आहे. माजी आमदार, माजी नगरसेवकांसह अनेक नेते सोईचे पक्ष शोधत असताना भाजपात जोरदार ‘इन्कमिंग’ सुरू झाले आहे. याच दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला (उबाठा) मोठा धक्का बसला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांनी शहराध्यक्षपदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या राजीनाम्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील शिवसेना (उबाठा)च्या तयारीला मोठा फटका बसला आहे. वाघेरे हे शहरातील प्रमुख शिलेदार मानले जात होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारीही भाजपात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून वाघेरे यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, नुकताच भाजपचे भोसरी आमदार महेश लांडगे आणि पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासोबत वाघेरे यांची बैठक झाली होती, ज्यामुळे पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले होते. संजोग वाघेरे यांचा राजकीय प्रवास संजोग वाघेरे हे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील प्रभावशाली चेहरा आहेत. ते यापूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होते आणि शहराध्यक्षपद भूषवले होते. तसेच, ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौरही राहिले आहेत. २०२३ च्या अखेरीस त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. पक्षप्रवेशानंतर त्यांना पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपद देण्यात आले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. वाघेरे यांच्या कुटुंबाचाही राजकारणात मोठा वाटा आहे. त्यांची पत्नी उषा वाघेरे या राष्ट्रवादीशी संलग्न असून, त्या नगरसेविका राहिल्या आहेत. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वाघेरे यांचा राजीनामा आणि संभाव्य भाजप प्रवेश यामुळे ठाकरे गटाची पिंपरी-चिंचवडमध्ये पंचाईत झाली आहे. पक्षाला आता शहरात वाघेरे यांच्या तोडीचा नेता शोधावा लागणार आहे.