Chhagan Bhujbal : मोठी बातमी! राष्ट्रवादीला पुन्हा अर्थखातं मिळणार; छगन भुजबळ म्हणाले…
Chhagan Bhujbal : या बैठकीत अर्थखात्याच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

अर्थखात्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुमारे एक तास चर्चा केली. सध्या अर्थखात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी पक्षाच्या नेत्यांनी केली. या मागणीवर मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. अर्थखाते लवकरात लवकर मिळावे, अशी पक्षातील आमदारांची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशनापूर्वी अर्थखाते मिळणार?
अर्थखात्याबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना अर्थखात्याची जबाबदारी लवकर निश्चित होणे आवश्यक आहे. या विषयावर मुख्यमंत्री सकारात्मक असून हिवाळी अधिवेशनापूर्वी अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे येईल.”
मात्र, अर्थखात्याचे हस्तांतरण नेमके कोणत्या तारखेला होणार, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून यासंदर्भात कोणता निर्णय घेतला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा फेटाळली
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा विषय फारसा चर्चेत नसताना नव्याने सुरू झालेल्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याचा कोणताही विषय सध्या त्यांच्या अजेंड्यावर नसल्याचे स्पष्ट केले. राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. मात्र, छगन भुजबळ यांनी या चर्चांना फेटाळून लावले.
United Nations: UN मध्ये भारताचा पाकिस्तानवर जोरदार प्रहार ; ‘बेकायदेशीर कब्जा करणाऱ्यांनी…’






