Murlidhar Mohol : विधानपरिषदेच्या पाचही जागा महायुती जिंकणार! मुरलीधर मोहोळ यांचा ठाम विश्वास
Murlidhar Mohol : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

‘पाचही जागा महायुती नक्की जिंकेल’; मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. सुशिक्षित मतदार हा विचारपूर्वक मतदान करतो आणि विकासाला प्राधान्य देतो, असे मोहोळ यांनी म्हटले.
ते म्हणाले, “जागतिक स्तरावर आणि देशपातळीवर काय घडत आहे, हे सुशिक्षित मतदार पाहत असतो. तो विचार करून मतदान करतो. देशाची प्रगती आणि राज्यातील विकासाचा वेग पाहता महाराष्ट्रातील या पाचही जागा महायुती निश्चितपणे जिंकेल, असा मला विश्वास आहे.”
गोकुळच्या निकालाचा विधानपरिषद निवडणुकीवर परिणाम होणार?
यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी गोकुळच्या निकालावरही भाष्य केले. ते म्हणाले “सहकार क्षेत्रातील निवडणूक आणि विधानपरिषदेची निवडणूक या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. या निवडणुकीत स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे विजयी होतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिक्षक मतदारसंघात काही ठिकाणी पक्षाच्या नेतृत्वाने मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेतल्याचे मोहोळ यांनी नमूद केले. तसेच महायुतीला मानणारा मतदार भाजपच्या पाठीशी उभा राहील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पाच जागांसाठी १८२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद होणार
राज्यातील छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघांसह अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी मतदान होत आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ अशी आहे. या निवडणुकीत एकूण १८२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
महायुतीमध्ये काही ठिकाणी झालेली बंडखोरी आणि पक्षांतर्गत नाराजी यामुळे अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत असल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागणार आणि मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलेला महायुतीच्या पाचही जागांवरील विजयाचा विश्वास प्रत्यक्षात उतरणार का, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.






